Shihan Hussaini Death: प्रसिद्ध अभिनेते, कराटे व तिरंदाजी तज्ज्ञ शिहान हुसैनी यांचे मंगळवारी (२५ मार्च) पहाटे निधन झाले. ६० वर्षांचे हुसैनी रक्ताच्या कर्करोगाशी लढा देत होते, याच दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या कुटुंबियांनी फेसबुकवर त्यांच्या निधनाच्या वृत्ताची पृष्टी केली आहे.
शिहान हुसैनी यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर कुटुंबीय व चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव चेन्नईतील बेसंत नगरमधील हायकमांड येथे त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. इथे कुटुंबीय आणि त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करू शकतील. त्यानंतर त्यांचे पार्थिव मदुराई येथे नेण्यात येईल, तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
हुसैनी यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. “मला कळवताना खूप दुःख होत आहे की एचयू आम्हाला सोडून गेले आहेत. त्यांचे पार्थिव संध्याकाळपर्यंत हायकमांड, बेझंट नगर येथील त्यांच्या घरी असेल,” असं त्याच्या कुटुंबियांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हुसैनी कर्करोगाशी लढा देताना येणारे अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत होते. ते त्यांच्या सोशल मीडिया पेजेसवर प्रकृतीबद्दल सतत अपडेट्स देत होते. तामिळनाडू सरकारने त्यांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. मृत्यूच्या काही दिवसाआधी हुसैनी यांनी वैद्यकीय संशोधनासाठी देहदान करण्याचा निर्णय जाहीर केला. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.
शिहान हुसैनी यांचे करिअर
हुसैनी यांनी १९८६ मध्ये कमल हासन यांच्या ‘पुन्नागाई मन्नन’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी रजनीकांत यांच्या ‘वेलईकरन’, ‘ब्लडस्टोन’ या तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं. विजयच्या ‘बद्री’मध्ये त्यांनी कराटे प्रशिक्षकाची भूमिका केली होती. विजय सेतुपतीचा ‘काथुवाकुला रेंडू काधल’ आणि ‘चेन्नई सिटी गँगस्टर्स’ हे त्याने अभिनय केलेले त्याचे शेवटचे सिनेमे होते.
चित्रपटांमध्ये अभिनय करण्याबरोबरच त्यांनी अनेक रिॲलिटी शोमध्ये प्रशिक्षक म्हणून काम केलं होतं. शिहान हुसैनी हे फक्त अभिनेते नव्हते, तर विविध कलांमध्ये पारंगत होते. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. चाहते सोशल मीडियावर पोस्ट करून शिहान हुसैनी यांना श्रद्धांजली वाहत आहेत.