‘लागीर झालं जी’ या मालिकेत भैयासाहेब हे खलनायकाचे पात्र साकारत घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे किरण गायकवाड. ‘देवमाणूस’ मालिकेतही डॉ. अजित कुमार देव या आणखी एका नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आला आणि त्याला अमाप लोकप्रियता मिळाली. त्यामुळे मालिकेबरोबरच ‘चौक’, ‘डंका हरी नामाचा’ यांसारखे चित्रपटही किरणला मिळाले. लवकरच दिग्दर्शकाच्या भूमिकेतही मी प्रेक्षकांसमोर येणार आहे, असे सांगणाऱ्या किरणची मुख्य भूमिका असलेला ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा चित्रपट येत्या शुक्रावारी प्रदर्शित होणार आहे. प्रकाश पवार दिग्दर्शित ‘नाद – द हार्ड लव्ह’ या चित्रपटात किरणसह यशराज डिंबळे, सपना पवार, विजय पाठक अशा नवोदित कलाकारांच्या भूमिका आहेत.
समाजकार्य करू पाहणाऱ्या तरुणाची संघर्षमय प्रेमकथा ‘नाद – द हार्ड लव्ह’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. समाजसेवा करण्याचं वेड या तरुणाला आहे. मात्र समाजसेवा म्हणजे नेमकं काय आणि त्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत, याची खरी जाण त्याला तेव्हाच होते जेव्हा त्याच्या आयुष्यात एक तरुणी येते. प्रेमकथा आणि प्रेमामुळेच एका तरुणात झालेला बदल, त्याच्या आयुष्याला मिळालेली दिशा… अशा पद्धतीची कथा ‘नाद – द हार्ड लव्ह’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असे अभिनेता किरण गायकवाडने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
हेही वाचा >>> गुप्तहेराच्या भूमिकेत वरुण धवन; ‘सिटाडेल’च्या भारतीय आवृत्तीची झलक प्रेक्षकांसमोर
‘नाद – द हार्ड लव्ह’ या चित्रपटात मी उदय माने हे पात्र साकारलं आहे. सध्या दिशाहीन असलेल्या अनेक तरुणांपैकी हा एक तरुण आहे. त्याला समाजासाठी काम करायचं आहे, पण ते कसं करायचं आणि नेमकं काय काम करायचं हेच त्याला माहिती नाही. त्याच्या मते तो समाजसेवक आहे, पण नक्की तो काय समाजसेवा करतो हे कोणी विचारलं तर त्याला उत्तर देता येणार नाही, अशी या तरुणाची अवस्था असल्याचे किरणने चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना सांगितले. ‘एक तरुणी त्याच्या आयुष्यात आल्यावर त्याच्यात कसा बदल होत जातो हे या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मला नृत्य, विनोद, अॅक्शन, भावनाट्य असं सगळं करायला मिळालं. एखाद्या कलाकाराला नायक म्हणून एकाच चित्रपटात सगळ्या गोष्टी करता आल्या तर जो आनंद होतो तोच आपल्याला झाला असल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल तो खूप उत्सुक असल्याचे त्याने सांगितले.
नव्याच्या शोधात…
भैयासाहेबपासून ते या चित्रपटापर्यंत काय शिकायला मिळालं, याबद्दल किरण म्हणतो, ‘मला या क्षेत्रात आल्यापासून आतापर्यंत खूप काही शिकायला मिळालं आहे आणि हे शिक्षण असंच सुरू राहिलं. या शिक्षणाचा फायदा करून घेत मी लवकरच एक चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. त्यामुळे या प्रवासात आलेले वेगवेगळे काही चांगले तर काही वाईट अनुभव घेऊनच माझी पुढची वाटचाल सुरू आहे. मला हल्ली हल्ली कळायला लागलं आहे की एखादी गोष्ट मनासारखी झाली की हुरळून न जाता पुढे आणखी उत्तम काम करत राहायचं. गेली ८ ते ९ वर्षं चित्रपट दिग्दर्शन करायचं स्वप्न उराशी बाळगून होतो. आता दिग्दर्शक म्हणून तो चित्रपट पूर्ण झाला, तेव्हाही भावनिक न होता मी खूप शांत होतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी मी शिकतो आहे, त्यामुळे हेही काम झालं की लगेच दुसरं नवीन काय याचा माझा शोध सुरू होईल’.
मला दिशादर्शकाची गरज आहे…
‘माझ्या मते कोणत्याही व्यक्तीला काय करायचं हे अचूकरीत्या माहिती असतंच असं नाही. प्रत्येक व्यक्ती त्याच्या करिअरच्या सुरुवातीला गोंधळलेली असते. मीदेखील आहे. मला स्वत:लाही कोणीतरी आपल्याला योग्य मार्गदर्शन करायला हवं असं वाटत असतं. कदाचित हा गोंधळ सुरू असल्यानेच की काय आपल्यापैकी प्रत्येकजण स्वत:साठी उत्तम काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत असतो’, असं मत किरणने व्यक्त केलं.
© The Indian Express (P) Ltd