अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या मुलाचं नाव जहांगीर आहे हे समजल्यावर त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. ज्यानंतर आपण यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही असा निर्णय चिन्मय मांडलेकरने घेतला. रुपेरी पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारा अभिनेता मुलाचं नाव जहांगीर कसं काय ठेवू शकतो? असं ट्रोलर्सचं म्हणणं होतं. या सगळ्यानंतर चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने व्हिडीओ पोस्ट करत मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं? हे सांगणारा व्हिडीओ पोस्ट केला. आता त्यावर किरण मानेंनी पोस्ट लिहिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे किरण मानेंची पोस्ट?

“किरण माने तुम्ही मराठा आहात. तुम्हाला लोकांचा एवढा सपोर्ट मिळतोय. ‘मराठा कार्ड’ वापरा. सोपी होईल लढाई.” एका राजकीय नेत्याने मला सल्ला दिला होता. आधीच सांगतो, ते नेते शरद पवारसाहेब किंवा जितेंद्र आव्हाड नव्हते. वेगळ्याच पक्षातले नेते होते, जे सध्या सत्ताधार्‍यांच्या वळचणीला गेलेले आहेत. त्यांनी संबंध नसताना असाच फोन करुन सल्ला दिला होता.

दोन वर्षे उलटून गेली याला. त्यावेळी माझ्या विरोधात अंधभक्तांनी ट्रोलिंग केले होते आणि स्टार प्रवाहच्या पेजवर जाऊन ‘किरण मानेला सीरियलमधून काढा’ असा धिंगाणा घातला होता… प्रचंड अर्वाच्य शब्दांत ट्रोलिंग झालं. त्यानंतर अचानक मला सीरियलमधून काढून टाकलं गेलं. मी याविरोधात लढायचा निर्णय घेतला. जनतेतून मला प्रचंड सपोर्ट मिळाला. त्यावेळची ही गोष्ट.

त्या नेत्याचं म्हणणं होतं की अशावेळी मराठा जातीचा आधार घेऊन लढणं, दबाव वाढवण्यासाठी खूप सोयीचं ठरलं असतं… कदाचित ते खरंही असावं… पण मला ते अजिबात मान्य नव्हतं. मी म्हणालो, मी जातीच्या कुबड्या वापरणार नाही. यात विनाकारण जात आणणं हे समाजात भेद निर्माण करणारं ठरलं असतं. माझी लढाई न्यायाची आणि संवैधानिक मूल्यांची आहे. मी प्रामाणिक आहे, सत्य माझ्या बाजूने आहे. मी माझी लढाई स्वबळावर लढणार… आणि ती लढलोसुद्धा. माझ्यावर आरोप करणारे आज कुठेही नाहीत. मी मात्र ताठ मानेनं ठामपणे उभा आहे.

हे पण वाचा- “महाराजांची भूमिका तुम्ही केली नाहीतर…”, चिन्मय मांडलेकरच्या निर्णयानंतर चाहते नाराज; म्हणाले, “दादा प्लीज…”

परवा चिन्मय मांडलेकरवर त्या मानाने खूप छोटंसं, किरकोळ ट्रोलिंग झालं. खरंतर तेही चुकीचंच होतं. पण आजकाल जनरली जे होतं त्या तुलनेत खूपच सौम्य होतं. पण त्यानंतर त्याच्या पत्नीने प्रतिक्रिया देताना, “मी ब्राह्मण आहे आणि तो कासार आहे. आम्ही हिंदू आहोत.” हे सांगणं फार भयानक होतं. सिंपथीसाठी असेल किंवा रागाच्या भरात असेल, पण हा वाद भलत्याच दिशेला नेणारं आणि असंबद्ध होतं. ट्रोल्सच्या हेतूंना बळकटी देणारं होतं.

धर्मांध अंधभक्तांचे ट्रोलिंग फोफावणाऱ्या आगीसारखं

धर्मांध अंधभक्तांचे ट्रोलिंग हे फोफावणार्‍या आगीसारखे झाले आहे. हळूहळू सगळेच होरपळणार आहेत यात. कुणाचीच सुटका नाही. त्यातून सुटका हवी असेल तर या ट्रोल्सना राक्षसी बळ देणार्‍या शक्तीला दणका देणं. चिन्मयच्या प्रकरणातला एक मुद्दा महत्त्वाचा आहे, ‘त्याने मुलाचे नांव २०१३ साली ठेवले. त्यावेळी तो अजिबात ट्रोल झाला नव्हता. पण आज या मुद्यावर शिवीगाळ होते आहे.’ याला म्हणतात ‘संविधान धोक्यात येणं’. या झुंडीनं तुम्हाला तुमच्या मुलाचं नाव ठेवायचं ‘स्वातंत्र्य’ ठेवलेलं नाही. जात आणि धर्म या आपल्या खासगी गोष्टी चव्हाट्यावर आणून ‘समता’ नष्ट करण्याचे प्रकार सुरू आहेत. ही दोन मुल्यं नसतील तर ‘बंधुता’ निर्माण कशी होणार?
बास. एवढंच लक्षात ठेवा आणि मतदान करा. हे ट्रोलींग-बिलिंग बंद करणं तुमच्या स्वत:च्या हातात आहे. थंड घ्या
जय शिवराय… जय भीम !

किरण माने

अशी पोस्ट किरण मानेंनी केली आहे. आता याबाबत चिन्मय मांडलेकर किंवा त्याची पत्नी काही प्रतिक्रिया देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल. या पोस्टवर विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor kiran mane reacts on chinmay mandlekar son getting trolled for his son name jehangir scj