राजकीय भूमिका घेत असल्याचं कारण देत ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेमधून अभिनेते किरण माने यांना काढून टाकण्यात आलंय. या प्रकरणावरुन सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असतानाच किरण माने यांनी या प्रकरणावरुन टीकाकारांना रोकठोक उत्तर दिलं आहे. किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं आहे. मात्र आता यापुढे किरण माने या मालिकेमध्ये दिसणार नाहीत. पण राजकीय भूमिका घेण्याचा आणि कामाचा काय संबंध आहे असा रोखठोक प्रश्न किरण मानेंनी विचारलाय.
“मला म्हणतात की तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आहात. पण एसटी संपाच्या वेळी मी एसटी कामागारांच्या बाजूने पाठिंबा देणारी पोस्ट लिहिली. तुम्ही ती वाचू शकता. पब्लिक पोस्ट असतात माझ्या. मी राज्य सरकारच्या बाजूने असतो तर ती पोस्ट कशी लिहिली असती?,” असा प्रश्न किरण माने यांनी विचारलाय. तसेच पुढे बोलताना त्यांनी, “कोणाचंही सरकार आलं तरी मी त्यावर जाब विचारत राहणार कारण हा माझा अधिकार आहे,” असंही त्यांनी म्हटलंय.
नक्की वाचा >> “मी चॅनेल हेड सतीश राजवाडेंना फोन केला, पण…”; किरण मानेंनी सांगितलं ‘त्या’ कॉलनंतर काय घडलं
“कलाकाराने राजकारणावर बोलू नये असं मला काही जण सुचवतात. तर का बोलू नये कलाकाराने असा माझा प्रश्न आहे,” असंही किरण माने म्हणाले. “मी एक किरण माने म्हणेल की जा मला नाही फरक पडत. पण अनेक लोक असे आहेत की ज्यांचं पोट त्याच्यावर आहे. ते लोक घाबरतात. माझा चॅनेलवर पण आक्षेप नाही. त्यांच्यावर कोणीतरी दबाव आणलाय. या दबावावर पण उत्तर देऊयात जेणेकरुन या सगळ्याचा पुन्हा विचार केला जाईल,” अशी अपेक्षा किरण माने यांनी ‘टीव्ही ९’शी बोलताना व्यक्त केलीय.
नक्की वाचा >> “मला कामावरुन काढून टाकलं तर…”; मालिकेतून काढून टाकल्याने अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना किरण मानेंचं उत्तर
आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या शब्दांमध्ये किरण मानेंनी मांडलेली मतं पोस्टच्या माध्यमातून व्हायरल होत असतात. या पोस्टवरुन अनेकदा त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केला जातो. त्यांचीही पोलखोल किरण माने करत असतात. किरण माने यांनी गुरुवारी सायंकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!,” असा मजकूर या पोस्टमध्ये आहे. आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला तरी आपण पुन्हा नव्याने उभारी घेऊ असे संकेत किरण मानेंनी आपल्या पोस्टमधून दिलेत.
सोशल मीडियावर किरण मानेंविरोधात वाहिनीने केलेल्या कारवाईवरुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अनेक चाहत्यांनी उघडपणे किरण मानेंना या प्रकरणामध्ये पाठिंबा दर्शवलाय. अनेकांनी या कारवाईला संस्कृती दहशतवाद असं म्हटलंय. #istandwith_KiranMane हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. अनेकांनी किरण मानेंवर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचं म्हटलंय.