स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं आहे. अल्पावधीच यशाच्या शिखरावर पोहचलेल्या या मालिकेमध्ये किरण माने हे त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असतात. ग्रामीण भाषेतील लहेजा त्यांच्या लेखणीमधून स्पष्टपणे जाणवतो. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात. मात्र आता याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणी साडपले आहेत. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता (Actor Kiran Mane Removed From Mulgi Zali Ho Serial Of Star Pravah) दाखवण्यात आलाय.
आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या शब्दांमध्ये किरण मानेंनी मांडलेली मतं पोस्टच्या माध्यमातून व्हायरल होत असतात. या पोस्टवरुन अनेकदा त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केला जातो. त्यांचीही पोलखोल किरण माने करत असतात. मात्र अशाप्रकारे राजकीय भूमिका घेणं त्यांना महागात पडल्याचं चित्र दिसत आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण माने यांनीच यासंदर्भात खुलासा करत राजकीय भूमिकेमुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे.
किरण माने यांनी गुरुवारी सायंकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!,” असा मजकूर या पोस्टमध्ये आहे. आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला तरी आपण पुन्हा नव्याने उभारी घेऊ असे संकेत किरण मानेंनी आपल्या पोस्टमधून दिलेत. किरण मानेंनी एका दैनिकाशी बोलताना, “होय, मला मालिकेतून काढून टाकले आहे. मला तासाभरापूर्वीच चॅनेलने ही माहिती दिली,” असं म्हटलंय. किरण मानेंनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.
सोशल मीडियावर किरण मानेंविरोधात वाहिनीने केलेल्या कारवाईवरुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अनेक चाहत्यांनी उघडपणे किरण मानेंना या प्रकरणामध्ये पाठिंबा दर्शवलाय. अनेकांनी या कारवाईला संस्कृती दहशतवाद असं म्हटलंय. “राजकीय भूमिका घेतल्याने आपल्या सर्वांचे लाडके किरण माने सरांना यांना स्टार प्रवाहाने मालिकेतून काढून टाकले आहे. हा सांस्कृतिक दहशतवाद नाही का..?,” असा प्रश्न तरुणाईमध्ये लोकप्रिय असणारा खास रे या फेसबुक पेजवरुन विचारण्यात आलाय. “जो माणूस वास्तव आणि न्यायाच्या बाजूने उभा राहतोय,जो माणूस तुमच्या आमच्या हक्कासाठी इथ उघडपणे व्यक्त होतोय, ज्यावेळी गरज असते त्यावेळी इतर कलाकार गप्प बसलेले असताना हा माणूस तुमचा माझा आवाज बनून आपली लेखणी आपल्यासाठी झिजवतो आहे…त्या माणसासाठी आता आपण सर्वांनी उभे राहायची गरज आहे,” असंही या पोस्टमध्ये म्हटलंय.
अशा पद्धतीच्या अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर आणि खास करुन मराठी पेजेस आणि अकाऊंटवरुन व्हायरल होताना दिसतायत. काहींना यामध्ये राजकीय समर्थन करणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांच्या कलाकारांची नावं घेत थेट अमुक एका पक्षाची बाजू घेणाऱ्यांबद्दल असं कधी घडलं नाही मग किरण मानेंसोबत असं का घडलं, असा सवाल उपस्थित केलाय. यासंदर्भात बोललं पाहिजे नाहीतर असले प्रकार वाढत जातील आणि एक चांगला कलाकार कायमचा पडद्यामागे जाईल अशी चिंताही काहींनी व्यक्त केलीय. काहींनी तर थेट स्टार प्रवाह वाहिनीवर बंदी घालण्याची मागणीही पोस्टवरुन केलीय.
#istandwith_KiranMane हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. अनेकांनी किरण मानेंवर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचं म्हटलंय.