आज शिवसेनेतल्या आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचं वाचन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं. त्यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचं म्हटलं आहे. तसंच १६ आमदारांपैकी एकावरही अपात्रतेची कारवाई केलेली नाही. ठाकरे गटाच्या आमदारांवरही कुठलीही कारवाई झालेली नाही. यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेते किरण माने यांनीही फेसबुकवर पोस्ट लिहून एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे किरण मानेंची पोस्ट?

“औरंगजेबाने या मुलुखावर ५१ वर्ष राज्य केलं होतं. तरीही आज हा मुलुख छत्रपती शिवाजी महाराजांनाच वंदनीय मानतो. पैसा आणि दहशतीच्या बळावर राजकीय सत्ता ‘हिसकावणं’ सोपं असतं… पण रयतेची मनं जिंकणं सोपं नसतं भावांनो. मुठभर मावळे हातात असून बलाढ्य शक्तीशी टक्कर देणारा जिगरबाजच जनतेच्या मनावर वर्षानुवर्ष राज्य करतो !” अशी पोस्ट किरण मानेंनी केली आहे. जी चांगलीच चर्चेत आहे.

खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. पक्ष आणि चिन्हही त्यांचंच आहे असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला आहे. तसंच भरत गोगावलेंचा व्हीप वैध आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. यापाठोपाठ १६ आमदारांपैकी एकालाही अपात्र करता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे या कायदेशीर लढाईत एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे.

१६ पैकी एकाही आमदाराला अपात्र करता येणार नाही

१६ पैकी एकाही आमदाराला अपात्र करता येणार नाही असं आज राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकाल वाचना दरम्यान म्हटलं आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटाने एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, लता सोनावणे, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरनारे, बालाजी कल्याणकर या सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. तसंच याचिकाही दाखल केली होती. याबाबत निर्णय देत असताना एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नसल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor kiran mane wrote the post in support of uddhav thackeray after mla dissertation result scj
Show comments