कोणताही कलाकार त्याच्या कारकीर्दीत अशा एका भूमिकेच्या शोधात असतो जी भूमिका त्याच्या करिअरला वेगळी कलाटणी देणारी असेल. अभिनेता क्षितीश दाते याने ‘धर्मवीर…मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या निमित्ताने हा अनुभव घेतला. त्याने या चित्रपटात एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली. त्याच्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : विराजस कुलकर्णी दिग्दर्शित ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

तो म्हणाला, “माझ्याकडे जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेची ऑफर आली तेव्हा आनंद आणि टेन्शन अशा संमिश्र भावना माझ्या मनात तयार झाल्या. अभिनेता म्ह्णून खूप मोठी संधी माझ्या हातात होती. प्रसाद ओक आनंद दीघे साकारणार होते आणि मी एकनाथ शिंदे. हे जेव्हा ठरलं तेव्हा मी पहिल्यांदा प्रसाद ओकला माझ्या मनातील दडपण बोलून दाखवलं. पण जसा एकनाथ शिंदे यांचा लुक मी केला आणि एकेक संवाद, देहबोली, बाज यातून मी त्या भूमिकेत शिरलो तसा मी कधी त्यांच्यात एकरूप झालो हे मलाही समजले नाही.”

क्षितिशने यावेळची एक आठवण सांगितली. तो म्हणाला, “कपाळावरचा कुंकवाचा टिळा, केसाचा भांग पाडण्याची विशिष्ट पध्दत, पांढऱ्या रंगाचा शर्ट पँट हा पेहराव, बोलताना हाताची हालचाल, चालण्याची ढब हे सगळं निरीक्षणातून आत्मसात केलं. एकदा मी एकनाथ शिंदे यांचा लुक पूर्ण करून गाडीतून निघालो होतो. गाडी ठाण्यात आली. गाडीच्या काचा उघड्याच होत्या. तेव्हा जिथे सिग्नलला गाडी थांबली किंवा ट्रॅफिकमध्ये गाडीचा वेग कमी झाला तेव्हा अनेक ठाणेकरांनी मला एकनाथ शिंदे समजून हात केला, नमस्कार केला, काही जणांनी शिंदे साहेब अशी हाक मारली. तिथे लुक म्हणून तर मी जिंकलो होतो आता पुढची जबाबदारी पार पाडायची हा निश्चय माझा ठाण्यातील त्याच छोट्या प्रवासात पक्का झाला.
एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांनी जेव्हा मला पाहिलं, मला भेटले तेव्हा मी त्यांना त्यांचा एकनाथच वाटलो.”

हेही वाचा : बाप्पाचे दर्शन, गप्पा आणि बरंच काही…एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेते नाना पाटेकरांची भेट

‘धर्मवीर…मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाने अक्षरश: रेकार्डब्रेक कमाई केली. अजूनही या सिनेमाची चर्चा थांबलेली नाही. अभिनेता प्रसाद ओक या सिनेमात आनंद दीघे यांच्या भूमिकेत आहे तर क्षितीश दाते याने वठवलेली एकनाथ शिंदे यांचीही भूमिका खूप गाजली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor kshitij date shared his experience of portraying role of eknath shinde rnv