रेश्मा राईकवार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रंगभूमीवर रमलेला आणि तरीही चित्रपट, वेबमालिका अशा विविध माध्यमांतून छोटेखानी विविधांगी भूमिकांमधून प्रेक्षकांचे मन जिंकून घेणारा कलाकार ही अभिनेता मकरंद देशपांडे यांची ओळख आहे. माणूस म्हणून सतत आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे अस्वस्थ व्हायला होतं आणि मग त्याची अभिव्यक्ती रंगभूमीवर एखाद्या नाटकरूपात होते, असे सांगणारा हा अभिनेता सध्या सोनी लिव्हवरील ‘जेंगाबुरु कर्स’ या वेबमालिकेतील भूमिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे.

 ‘जेंगाबुरू कर्स’ ही पर्यावरणीय विषयावर आधारित काल्पनिक कथा आहे. अशाप्रकारची ही पहिलीच क्लाय-फाय वेबमालिका असल्याचा दावा केला जातो आहे. मुळात निसर्गाच्या विनाशाचं काम कशापद्धतीने सुरू आहे हे सांगणारी ही वेबमालिका आहे. त्यामुळे विषय आणि भूमिका दोन्ही दृष्टीने ती आव्हानात्मक आहे, असं मकरंद देशपांडे यांनी सांगितलं. या वेबमालिकेत त्यांनी ओडिसातील जेंगाबुरू गावात काम करणाऱ्या डॉक्टरची भूमिका केली आहे. सगळं सोडून आदिवासींसाठी क्लिनिक चालवणारा हा सहृदय डॉक्टर कळत नकळतपणे गावात सुरू असलेलं खाणकाम, त्या माध्यमातून पोलीस, परदेशी कंपन्या, राजकीय नेते यांचं एकमेकांशी असलेलं साटंलोटं या जाळय़ात कसा गुंतत जातो, याचं चित्रण या वेबमालिकेतून करण्यात आलं आहे, अशी माहिती मकरंद यांनी दिली.

 एकीकडे निसर्गाच्या विनाशाचं काम सुरू आहे हे समोर ढळढळीत डोळय़ांना दिसत असूनही कमालीची असाहाय्यता अनुभवणाऱ्या सामान्य डॉक्टरची भूमिका त्यांनी रंगवली आहे. मात्र सध्या थोडय़ाफार फरकाने वास्तवातही आजूबाजूला असेच वातावरण अनुभवायला मिळते आहे, असं मकरंद यांनी सांगितलं. ‘माणसाने माणसाच्या मनात तेढ निर्माण करणं हेच मुळी काय आहे हे लक्षात येत नाही. हा अमूक एक धर्माचा म्हणून त्याला मारायचं? काय आहे हे राजकारण?’ असे प्रश्न उपस्थित करणाऱ्या मकरंद यांनी सध्या सगळीकडे खूप संहारक वृत्ती भरून राहिली आहे. माथेफिरू रागीट तरुण सर्वत्र फिरत आहेत याचं कारण माणसाला एकमेकांप्रति प्रेम आणि आदरच उरलेला नाही, असं मत व्यक्त केलं. ‘जेंगाबुरू कर्स’ या वेबमालिकेच्या माध्यमातून किमान निसर्गावर प्रेम करा. ते करता आलं तर माणसावरही प्रेम करता येईल हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं. प्रेमही करायचं नसेल तर किमान काळजी तरी असू दे. विनाकारण एखाद्याचा तिरस्कार नको, असा सल्लाही मकरंद यांनी दिला.

अस्वस्थतेतून उतरलेलं नाटक

रंगभूमी हा कलाकारासाठी भक्कम आर्थिक स्रोत असू शकत नाही हे ठाम मत मकरंद देशपांडे कायम व्यक्त करत आले आहेत. मात्र सध्या मराठीत नाटकाला जो प्रतिसाद मिळतो आहे तो खूप सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं. नाटक जगायलाच पाहिजे. भवतालात घडणाऱ्या घटनांचं प्रतििबबच या नाटकांमधून उमटत असतं, हे सांगताना त्यांनी त्यांच्या ‘सैनिक’ या नुकत्याच केलेल्या नाटकाचा दाखला दिला. ‘युद्ध कोणत्याही देशात होवो मरणारा सैनिक कोण असतो? रशिया आणि युक्रेन युद्ध आपण सध्या पाहतो आहोत. युद्ध घडवून आणणं आणि त्यासाठी त्या त्या देशातल्या तरुणांना हौतात्म्य पत्करण्यासाठी तयार करणं हे कोण करतं? या सगळय़ात त्या सैनिकाला नक्की काय मिळतं? देशासाठी बलिदान केल्याचं सुख मिळतं?.. अशा अनेक पैलूंवर ‘सैनिक’ हे नाटक बेतलं असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘सियाचिन’ या नवीन नाटकाचे प्रयोगही सध्या सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं.

‘सर सर सरला’ मराठीत.. 

पन्नासहून अधिक नाटकं लिहिणाऱ्या मकरंद देशपांडे यांचं ‘सर सर सरला’ हे नाटक लोकांना खूप आवडलं. मराठीतही त्याचे प्रयोग झाले होते, मात्र ‘सर, प्रेमाचं काय करायचं!’ या नावाने ते नाटक मराठीत रंगभूमीवर आलं होतं, अशी माहिती देतानाच आता ‘सर सर सरला’ या नावानेच मराठीत हे नाटक रसिकांसमोर येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये ‘सर सर सरला’चे मराठी प्रयोग सुरू होतील, असं त्यांनी सांगितलं.

उडिया कलाकारांबरोबर काम करणं भावलं..

मकरंद देशपांडे यांनी हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड अशा विविध भाषिक चित्रपटांतून काम केलं आहे. ‘जेंगाबुरू कर्स’ या वेबमालिकेतही त्यांनी दाक्षिणात्य अभिनेते नासर आणि अभिनेत्री फारिया अब्दुल्ला यांच्याबरोबर काम केलं आहे. भाषा आणि कलाकारांच्या बाबतीत सातत्याने प्रयोग करणाऱ्या मकरंद यांनी ‘जेंगाबुरू कर्स’ करताना स्थानिक उडिया कलाकारांबरोबर काम करणं अधिक भावल्याचं सांगितलं. या वेबमालिकेसाठी त्यांनी उडिया भाषेत संवाद म्हटले आहेत. या कलाकारांकडूनच उडिया शिकणं आणि त्यांच्याबरोबर काम करणं या दोन्ही गोष्टीत नावीन्य आणि गंमत होती, असं त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor makarand deshpande jengaburu curse web serieson sony liv zws