नोएडाचे ट्विन टॉवर्स सध्या चर्चेत आहेत. बेकायदेशीर बांधकामुळे ट्विन टॉवर २८ ऑगस्ट रोजी पाडण्यात आले. या ट्विन टॉवर्समुळे ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेता मनित जौरा याची स्वप्नेही धुळीला मिळाली आहेत. सुपरटेक ट्विन टॉवर्समध्ये ‘कुंडली भाग्य’ मालिकेत ऋषभ लुथराची भूमिका साकारणाऱ्या मनित जौराचीही दोन घरं होती. मात्र ट्विन टॉवर पडल्याने त्याची घरंही मातीत मिळाली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : नावातून ‘खान’ आडनाव वगळण्याच्या माझ्या निर्णयाला मुलाने केला विरोध, सीमा सजदेहचा खुलासा

‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना मनितने सांगितले, “माझ्या वडिलांनी ट्विन टॉवर्समध्ये दोन फ्लॅट घेतले होते, एपेक्स आणि सायने. त्यांनी माझ्यासाठी गुंतवणूक म्हणून एक फ्लॅट २०११ मध्ये आणि दुसरा २०१३ मध्ये घेतला. या टॉवर्सच्या बांधकामाशी संबंधित समस्या आणि बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध सुरु असलेला खटला यांची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. त्याबद्दल जाणून घेण्याचा आम्हाला अधिकार होता, पण त्यांनी आम्हाला त्याबद्दल काहीही सांगितले नाही. जेव्हा आम्हाला त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्याची माहिती मिळाली, तेव्हा आम्ही एका प्रख्यात वकीलाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. कारण आम्हाला आमचे पैसे परत हवे होते. त्यामुळे माझ्या वडिलांना बरीच वर्षे कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. त्यांना या वयात खूप काही सहन करावे लागले याचे मला खूप वाईट वाटते. आपल्या देशात घर म्हणजे केवळ फ्लॅट नसून त्यात आपल्या भावना गुंतलेल्या असतात. माझ्या वडिलांनी एका चांगल्या ठिकाणी चांगले घर घेण्याचे स्वप्न पाहिले होते, परंतु तसे झाले नाही.

कोर्टाने बांधकाम व्यावसायिकांनी खरेदीदारांना दिलेल्या रकमेवर व्याज द्यावे लागेल, असा निकाल दिला. पण त्यांनी आम्हाला फक्त काही महिने व्याजाची रक्कम दिली. तेव्हाच आम्ही दुसरी केस दाखल केली. त्यानंतर, पुन्हा त्यांनी आम्हाला काही महिन्यांनी थोड्या प्रमाणात पैसे द्यायला सुरुवात केली, पण त्याचा फायदा झाला नाही. कारण आम्ही घर खरेदी करताना जी रक्कम भरली होती ती या मिळत असलेल्या रकमेच्या खूप मोठी रक्कम होती.”

हेही वाचा : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अनुपम खेर यांनी दिली प्रतिक्रिया, ट्वीट करत म्हणाले…

शेवटी तो म्हणाला, “जे काही झाले ते माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी एक भयानक स्वप्न होते. मी माझ्या वडिलांना न्यायालयात निकाल आपल्या बाजूने लागेल या आशेने बसलेले पाहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मी खूश आहे. या प्रकरणाचा योग्य निकाल लावत कोर्टाने आपल्या देशातील इतर लोक आणि बांधकाम व्यावसायिकांसमोर एक आदर्श ठेवला आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor manit jaoura had two flats in noidas twin towers said it was painful rnv