आज (२२ जानेवारी रोजी) अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या भव्य कार्यक्रमासाठी अयोध्यानगरी सजली आहे. या सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी, अनेक दिग्गज राजकारणी आणि सिनेसृष्टीतील कलाकार अयोध्येला पोहोचत आहेत. बॉलिवूडमधील बरेच कलाकार या कार्यक्रमासाठी मुंबईतून रवाना झाले आहेत. एकूणच साऱ्या देशभरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
नुकतंच हिंदी चित्रपटसृष्टी व रंगभूमी गाजवणारे अभिनेते मनोज जोशी यांनीदेखील मीडियाशी संवाद साधतांना त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकूणच हा दिवस सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे आणि खासकरून भारतीयांना अत्यंत भावुक करणारा आजचा दिवस असल्याचं मनोज जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.
‘एएनआय’शी संवाद साधताना मनोज जोशी म्हणाले, “ही फार वेगळीच भावना आहे. आपल्या राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा आज होणार आहे. यासाठी कित्येक पिढ्यांनी कित्येक वर्षे वाट पाहिली आहे. कित्येक पिढ्यांनी याचं स्वप्नं उराशी बाळगलं होतं. आता अखेर प्रतीक्षा संपली आहे. हा आपल्यासाठी फार भावुक क्षण आहे. याविषयी व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत.”
दरम्यान, राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटींना निमंत्रित करण्यात आलं आहे. कंगना रणौत तर दोन दिवसांआधीच अयोध्येला पोहोचली आहे. याशिवाय ‘रामायण’ मालिकेत राम, लक्ष्मण व सीता यांच्या भूमिका साकारणारे अरुण गोविल, सुनील लहरी व दिपिका चिखलियादेखील अयोध्येत या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत.