ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते खूपच संतापलेले दिसत आहेत. त्यांनी त्यांचा हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्यांच्या चिडण्याचे कारणही तितकेच गांभीर होते. एअर इंडिया या विमान कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे मनोज जोशी यांना राग अनावर झाला. एअर इंडियाच्या अनागोंदी कारभारामुळे मनोज जोशी यांचा दिवस वाया जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मनोज जोशी यांनी मुंबई विमानतळावरील लगेज बेल्टजवळ हा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओत ते अतिशय चिडलेले दिसत आहेत. ते या व्हिडीओत म्हणाले, “मी प्रवास करत असलेले विमान जवळपास तीन तास उशिरा उडाले. त्यानंतर आता सामान घेण्यासाठी मी गेल्या ४५-५० मिनिटांपासून लगेज बेल्टजवळ उभा आहे, पण माझे सामान अजूनही आलेले नाही. एवढेच नाही तर, तिथे एअर इंडियाचा एकही कर्मचारी नाही, ज्यांच्याशी संपर्क मला साधता येईल.” त्यासोबतच “एअर इंडिया कधी सुधारणार आहे की नाही?” असा प्रश्नही मनोज जोशी यांनी उपस्थित केला. मनोज जोशी यांनी ट्वीटमध्ये एअर इंडिया आणि छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळालाही टॅग केले आहे.
त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एअर इंडियाची फ्लाइट ६३४ भोपाळहून ३ तास उशिरा निघाली आणि आता मी ४० मिनिटे मुंबईत लगेज बेल्टजवळ उभा आहे. त्यासोबतच इथे एअर इंडियाचा एकही कर्मचारी नाही. इतकी वाईट सेवा मी आतापर्यंत कधीच अनुभवली नाही. त्यांनी माझा संपूर्ण दिवस खराब केला केला. याची नुकसान भरपाई कोण देणार?”
दरम्यान, मनोज जोशींच्या या ट्विटला विमान कंपनीच्या व्यवस्थापकांनीही उत्तर दिले आहे. एअर इंडियाच्या वतीने लिहिले होते, ‘प्रिय मनोज जोशी, आम्हाला आशा आहे की तुम्हाला तुमचे सामान मिळाले असेल. निश्चिंत राहा, आम्ही तुमचा अभिप्राय विमानतळ टीमपर्यंत पोहोचवला आहे. आम्ही त्याचा आढावा घेत आहोत. आम्ही आशा करतो की पुढच्या वेळी तुम्हाला अधिक चांगली सेवा देऊ शकू.”