ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपा खासदार मिथून चक्रवर्ती यांच्या चित्रपटांचा आणि त्यांचा एक विशेष चाहता वर्ग आहे. मिथून चक्रवर्ती यांना त्यांचे चाहते आणि इंडस्ट्रीतील कलाकार मिथूनदा, दादा अशा नावाने हाक मारतात. मिथूनदांचं वय झालं असलं तरी ते चित्रपटांमध्ये काम करतात. याशिवाय छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून ते दिसतात. आपल्या उत्तम अभिनयाने एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या मिथून चक्रवर्ती यांनी एक अनोखा विक्रम रचलाय. तो विक्रम रचून ३३ वर्ष उलटली आहेत, परंतु इतर कोणत्याही अभिनेत्याला त्यांचा हा विक्रम मोडता आलेला नाही.
हा विक्रम त्यांनी १९८९ साली रचला होता. यावर्षी मिथुन चक्रवर्तींचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले. एका वर्षात मुख्य अभिनेता म्हणून तब्बल १९ चित्रपट त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्या नावाने हा विक्रम नोंदवला गेला. नवभारत टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार १९८९ साली मिथुनदाचे एकापाठोपाठ एक १९ चित्रपट प्रदर्शित झाले होते. या सर्व चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. त्यांचा हा विक्रम आजपर्यंत कोणताच कलाकार मोडू शकलेला नाही.
बंगाली कुटुंबात जन्मलेले मिथून चक्रवर्ती चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी नक्षली होते, पण त्यांच्या भावाच्या मृत्यूनंतर ते कुटुंबाजवळ परतले. त्यांनी ‘मृगया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट केले. ७० ते ८० च्या दशकापर्यंत त्यांनी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले.