बॉयकॉट ट्रेंडमुळे ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘लाल सिंह चड्ढा’, ‘रक्षा बंधन’ सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत आहेत. बॉलीवूड चित्रपटांवर लोक सतत बहिष्कार टाकत आहेत. त्यामुळे अर्जुन कपूर, तापसी पन्नू, आमिर खान आदी बॉलिवूड स्टार्स नाराज होऊन त्यांचे टेन्शन वाढले आहे. पण अशातच प्रेक्षकांच्या भावना समजून घेण्याऐवजी सेलिब्रिटी प्रेक्षकांच्या भावनांविरोधात वक्तव्ये करत आहेत. बॉलिवूडची अशी अवस्था पाहून ‘शक्तिमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना संतापले आहेत. या परिस्थितीवर त्यांनी बॉलिवूड स्टार्सचा समाचार घेतला आहे.
आणखी वाचा : बॉयकॉट ट्रेंडबद्दल विचारल्यावर कपिलला झाली ‘त्या’ किस्स्याची आठवण
मुकेश खन्ना म्हणाले, “बॉलिवूड बुडण्याच्या मार्गावर आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या आजच्या दुर्दशेला बॉलीवूडशिवाय दुसरे कोणीही जबाबदार नाही. गेल्या तीन-चार वर्षांपासून हिंदी चित्रपट सतत फ्लॉप होत आहेत आणि साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अप्रतिम कमाई करत आहेत. बॉलिवूड बुडत आहे. तरीही बॉलीवूड स्टार्स अशी विधाने करत आहेत, ज्यामुळे असे वाटते की एकतर ते अतिआत्मविश्वासात आहेत किंवा ते डोळे झाकून बसले आहेत.”
“अलीकडेच स्वतःला स्टार समजणारी एक नायिका म्हणाली होती, ‘आमच्यावरही बहिष्कार टाका,’ असं विधान कोणी करतं का! तेही जेव्हा बहिष्काराच्या ट्रेंडमुळे दोन ते तीन चित्रपट फ्लॉप झाले आहेत. हे निषेधार्ह आहे. आणखी एक अभिनेता आहे, जो जनतेशी लढायला तयार झाला आहे. जनता जनार्दन आहे. तुमचे चित्रपट तेच फ्लॉप करतात आणि हिटही तेच करतात,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या बॉलिवूड सेलिब्रिटींना टोला लगावला. तसेच आज बॉलीवूड अशा ठिकाणी पोहोचले आहे की ज्याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल, असेही त्यांचे मत आहे.
हेही वाचा : करीना कपूर, अर्जुन कपूर होत आहेत ट्रोल, तर शाहरुखचं होतंय कौतुक.. जाणून घ्या कारण
हे सगळं सांगत असताना या परिस्थितून बाहेर पाडण्यासाठी मुकेश यांनी काही उपायही सांगितले. ते म्हणाले, “हिंदू देवी-देवतांची चेष्टा करणे बंद करा, धार्मिक चित्रपट बनवा, धर्मविरोधी चित्रपट बनवू नका, स्टार्सनी त्यांची फी कमी करावी, प्रथम एक कथा तयार करा, नंतर स्टार्स निवडा, चित्रपटगृहानंतर चित्रपट काही महिन्यांनी ओटीटीवर प्रदर्शित करा, जुन्या दिग्दर्शकांना संधी द्या आणि वितरण व्यवस्था परत आणा, असे केले तरच बॉलिवूडची परिस्थिती भविष्यात सुधारू शकेल.”