Actress and BJP leader Namitha: तमिळ अभिनेत्री आणि भाजपा नेत्या नमिता यांना मदुराईमधील मिनाक्षी सुंदरेश्वरी मंदिरात एका धक्कादायक प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. नमिता या सोमवारी (दि. २६ ऑगस्ट) पतीसमवेत मंदिरात दर्शनासाठी गेल्या असता मंदिर प्रशासनाने त्यांच्याकडे हिंदू असल्याचा पुरावा मागितला. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, नमिता यांनी आरोप केला की, मंदिर प्रशासनाने त्यांना प्रवेश नाकारला आणि हिंदू असल्याचा पुरावा मागितला.
“पहिल्यांदाच मला स्वतःच्या देशात आणि माझ्या स्वतःच्या राज्यात परके असल्याची भावना दिसून आली. मी हिंदू आहे, याचा मला पुरावा द्यावा लागला. मला पुरावा मागितला याचे वाईट वाटले नाही, पण तो कशापद्धतीने मागितला गेला, याचे अधिक वाईट वाटले. मंदिर प्रशासनाचा अधिकारी आणि त्याचा सहकारी आमच्याशी अतिशय उद्धट पद्धतीने वागले”, असा आरोप अभिनेत्री नमिता यांनी केला.
अभिनेत्री नमिता या भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. त्या म्हणाल्या की, मी हिंदू म्हणून जन्मले आहे. माझे लग्न तिरुपती येथे झाले आणि माझ्या मुलाचे नाव भगवान श्रीकृष्णाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. तरीही मंदिरातील कर्चाऱ्यांनी आमच्याशी अतिशय उद्धट पद्धतीने संवाद साधला. तसेच माझी जात आणि श्रद्धा सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावा मागितला.
दरम्यान मंदिर प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नमिता आणि त्यांचे पती हे मास्क परिधान करून मंदिरात प्रवेश करत होते. त्यामुळे ते हिंदू आहेत का? याची चौकशी करण्यात आली. तसेच त्यांना मंदिरातील परंपरांची माहिती देण्यात आली. तसेच त्या हिंदू असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांच्या कपाळी गंध लावून त्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. मात्र या प्रसंगाची माहिती देताना नमिता म्हणाल्या की, मी हिंदू असल्याचा पुरावा दिल्यानंतर मला मंदिरात प्रवेश दिला गेला. त्याआधी माझ्या कपाळाला कुंकू लावण्यात आले.
२० मिनिटे मला थांबवून ठेवले
नमिता यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांच्याबरोबर घडलेला प्रसंग कथन केला आहे. आम्ही २० मिनिटे मंदिराबाहेर एका कोपऱ्यात उभे होतो. आमच्या या भेटीबद्दल स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली होती. तसेच आमच्या येण्यामुळे इतर भाविकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही मास्क परिधान केला होता, असे त्या म्हणाल्या.
मंदिर प्रशासनातील उद्धट कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नमिता यांनी आपल्या व्हिडीओत तमिळनाडूचे धर्मादाय मंत्री पी. के. शेखर बाबू यांच्याकडे केली.