Nana Patekar on Hindu-Muslim Issue: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या रोखठोक व परखड भूमिकांसाठी ओळखले जातात. सामाजिक व राजकीय विषयांवर नाना पाटेकर कोणताही आडपडदा न ठेवता आपली स्पष्ट मतं मांडताना दिसतात. महाराष्ट्र व देशाच्या राजकीय वातावरणात हिंदू व मुस्लीम या गोष्टी सातत्याने चर्चेत राहिल्या आहेत. निवडणुकांच्या काळात हे सातत्याने जाणवत असताना या सर्व पार्श्वभूमीवर नाना पाटेकर यांनी याबाबत त्यांच्या लहानपणीची एक आठवण सांगितली आहे.
बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील वाटचालीबरोबरच अनेक सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी हिंदू-मुस्लीम मुद्द्यावरही नाना पाटेकर यांनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली. यासाठी त्यांनी एका रिक्षावाल्यासोबत झालेला संवाद व लहानपणी त्यांच्या आईशी झालेला संवाद यांचे दाखले दिले आहेत.
“..तो म्हणाला मला मारावं!”
“सध्या सामाजिक समतोल सध्या एवढा ढळलाय, की मला बाहेर फिरताना भीती वाटते. मी एकदा रिक्षानं जात होतो. रिक्षावाल्याची दाढी वाढली होती. तो मुसलमान दिसावा अशी त्याची दाढी होती. पण तो पुण्याची अस्खलित मराठी बोलत होता. ३४-३५ वर्षांचा असेल. तो म्हणाला मी क्रांतीवीर पाहिला. समाजात विषमता वगैरे आहे. मी म्हटलं तू जाणीवपूर्वक एवढी दाढी वाढवून का फिरतोयस? तुला भीती वाटत नाही का? तर तो म्हणाला उलट मला वाटतं की मला मारावं. मी मुसलमान दिसतोय तर मला मारा. टिळा लावून फिरणाऱ्याला भीती वाटत नाही”, अशी आठवण नाना पाटेकर यांनी सांगितली.
“आपण जे आहोत तेच असायचं. मी काय आहे हे पाहून मला भीती वाटता कामा नये. मी अमुक घरात जन्मलो म्हणून मला मुसलमानाचा एक टिळा लागला. पलीकडच्या घरात जन्मलो असतो तर मला हिंदूचा टिळा लागला असता. आपण या घरात जन्मलो किंवा त्या घरात जन्मलो या आपल्या चुका आहेत का?” असा उद्विग्न सवाल नाना पाटेकर यांनी यावेळी केला.
आईला विचारला फरक, आई म्हणाली…
दरम्यान, लहानपणी आपण आईला हिंदू व मुसलमान यांच्यातला फरक विचारला होता, असं नाना पाटेकर यांनी सांगितलं. “मी जेव्हा लहानपणी आईला विचारलं की हिंदू आणि मुसलमान यातला फरक काय? तर आई म्हणाली आपण हात जोडून नमस्कार करतो ते दोन हात उघडून नमस्कार करतात एवढाच फरक आहे”, असं सांगत नाना पाटेकरांनी आधी नमस्काराची कृती करून दाखवली आणि नंतर नमाजसाठी करतात तशा पद्धतीने दोन्ही हात जोडून दाखवले.
राजकारण्यांच्या भाषांवर नाना पाटेकरांचं बोट
दरम्यान, हल्ली काही राजकीय नेतेमंडळी वापरत असलेल्या भाषेवर नाना पाटेकरांनी बोट ठेवलं. “तुम्हाला स्वत:ला दोष देता आला पाहिजे. सतत समोरच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा मी काय आहे हे बघणं तु्म्हाला ज्या वेळी जमेल, त्या दिवशी समाजातली विसंगती दूर होईल. पण ते होत नाही. आता राजकारणातच बघा. काय पद्धतीने बोलतात. अरे बापरे. गलिच्छ शब्द म्हणजे किती. खरंच राजकारणात येणारी जी मुलं आहेत, त्यांना वाटेल हेच राजकारण आहे का?” असं नाना पाटेकर म्हणाले.