आपल्या सहज-सुंदर अभिनय कौशल्याने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता इरफान खान आज काळाच्या पडद्याआड केला. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्याने बुधवारी अखेरचा श्वास घेतला. अंग्रेजी मीडियम हा इरफान खानची भूमिका असलेला अखेरचा सिनेमा. लॉकडाउनचा फटका इरफानच्या या सिनेमालाही बसला. म्हणून अखेरीस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी इरफानने ट्विट करत आपल्या सर्व चाहत्यांना हा सिनेमा पाहण्याची विनंती केली होती.

पंकज त्रिपाठीने या सिनेमात इरफान खानसोबत एक छोटी भूमिका केली आहे. इरफानच्या निधनाची बातमी समजल्यानंतर पंकज त्रिपाठीने, काही गोष्टी शब्दांत मांडता येत नाही, आज तसंच होतंय अशा आशयाचं ट्विट करत इरफानला श्रद्धांजली वाहिली आहे.

इरफान खानने मार्च २०१८ मध्ये कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर त्याने सर्व कामं थांबवली होती आणि उपचारासाठी लंडनला निघून गेला होता. २०१९ मध्ये परतल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. चित्रपटातील अभिनयासाठी इरफान खानचं कौतुक करण्यात आलं होतं. सोबतच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्याबद्दल आनंदही व्यक्त केला होता. जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.

Story img Loader