बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंकज हे ‘मीमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. पंकज त्रिपाठी यांनी अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. गँग्स ऑफ वासेपुर ते मिर्झापूर अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी अनेकांची मने जिंकली आहेत. प्रत्येक कलाकाराला ज्याप्रमाणे सुरुवातीच्या काळात संघर्ष करावा लागतो, त्या प्रमाणे पंकज त्रिपाठी यांनाही सुरुवातीला संघर्ष करावा लागला. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच रेडियो जॉकी सिद्धार्थ कन्नने पंकज त्रिपाठी यांची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. तसेच यावेळी त्यांनी सिनेसृष्टीतील त्यांच्या प्रवासाबद्दलही माहिती दिली. यावेळी पंकज त्रिपाठी म्हणाले, “सिनेसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात अनेकांनी माझा अपमान केला. पण आता मला या गोष्टींची आठवणही येत नाही. जे माझ्यासोबत अशाप्रकारे वागलेत ते अजूनही कधीकधी मला भेटतात. मात्र त्यांना एकेकाळी ते मला चांगल वाईट बोललेत याची आठवणही नसते.”

यानंतर सिद्धार्थने त्याला विचारले की मग अशा लोकांच्या बोलण्यामुळे तुम्हाला काही फरक पडतो का? याबद्दल तुम्हाला कधी वाईट वाटलंय का? यावर उत्तर देताना पंकज त्रिपाठी म्हणाले, “हो, शेवटी मी पण एक माणूसच आहे. मला वाईट का वाटले नसावे? मला पण राग येतो. पण मी या सगळ्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करतो. कारण मनात वाईट गोष्टी ठेवल्या तर त्यात माझेच नुकसान आहे. त्यामुळे मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला.”

हेही वाचा : “तब्बल २१ वर्षानंतर…”, ‘मिस युनिव्हर्स’ विजेत्या हरनाझ संधूची पहिली प्रतिक्रिया

पंकज त्रिपाठी हे मूळचे बिहारमधील गोपालगंज या ठिकाणचे आहे. त्याचा सिनेसृष्टीतील प्रवास फार कठीण होता. २००४ मध्ये रण या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. मात्र हा चित्रपट फारसा चालला नाही. पंकज त्रिपाठींना खरी ओळख २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ओमकारा या चित्रपटातून मिळाली. आता लवकरच ते रणवीर आणि दीपिकाच्या 83 या चित्रपटात झळकणार आहे. त्यासोबतच अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे आणि आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor pankaj tripathi talk about those who humiliated him who dont recall that in his early days nrp