अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तीन लग्नं केली. त्यांचं पहिलं लग्न नंदिनीशी झालं होतं, २००८ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००९ मध्ये पवण कल्याण यांनी रेणू देसाईशी लग्न केलं. लग्नाआधीच या दोघांना २००४ मध्ये मुलगा झाला. त्याचं नाव अकिरा आहे. लग्नानंतर रेणू व पवन यांना मुलगी झाली. हे दोघे २०१२ मध्ये विभक्त झाले आणि पवन कल्याण यांनी २०१३ मध्ये रशियन अभिनेत्री अ‍ॅना लेझनेवाशी लग्न केलं. आता पवन यांची दुसरी बाको रेणू हिने एकटीने मुलांचा सांभाळ करण्याबद्दल भाष्य केलं आहे.

निखिल विजयेंद्र सिम्हा पॉडकास्टमध्ये रेणूने सांगितलं की तिच्या मुलांप्रती जबाबदारीची भावना तिला दुसरं लग्न करण्यापासून रोखत आहे. “नक्कीच, मलाही एक जोडीदार असावा असं वाटतं, पण माझ्या मुलांसाठी जबाबदारीची जाणीव मला ते करण्यापासून रोखते,” असं रेणू म्हणाली. एक बॉयफ्रेंड असावा, त्याच्याशी लग्न करावं असं वाटतं पण मुलांसाठी ते आता करायचं नसल्याचं तिने नमूद केलं.

दुसऱ्या लग्नाबद्दल रेणू म्हणाली…

रेणू पुढे म्हणाली, “मी प्रयत्न केला आणि साखरपुडा केला. ते अरेंज मॅरेज असणार होतं, पण मला नंतर लक्षात आलं की या लग्नानंतर त्या नात्याला किंवा मुलांना पूर्ण न्याय देऊ शकणार नाही. मी एकटी मुलांचा सांभाळ करतेय. जेव्हा तुम्ही एखाद्याशी लग्न करता आणि त्यांच्याबरोबर मुलं होतात आणि आधीच मुलं असताना दुसऱ्याशी लग्न करणं यात फरक आहे. खरं तर ही खूप संवेदनशील गोष्ट असते.” २०१८ मध्ये रेणूने साखरपुडा केला आणि नंतर साखरपुडा मोडला.

रेणू म्हणाली की तिची मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ती दुसऱ्या लग्नाचा विचार करेल. ती कॉलेजला जायला लागल्यावर यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं रेणूने सांगितलं.

रेणू व पवन कल्याण यांचा घटस्फोट होऊन १३ वर्षे झाली आहेत. पण अजूनही रेणूला पवन कल्याण याचे चाहते ट्रोल करतात, असा दावा तिने केला. अभिनेता देवासारखा आहे, त्यामुळे रेणूने संसार नेटाने करायला हवा होता, असं त्याचे चाहते म्हणतात.

रेणू म्हणाली, “माझ्या भूतकाळातील गोष्टींचे आघात माझ्यावर अजूनही आहेत. ते आघात कधीच जाणार नाहीत. ते कायम राहतील. जे आहे ते मी स्वीकारलंय आता मी यापुढे लढू शकत नाही.” जेव्हा पुरुष व्यावसायिकदृष्ट्या जास्त यशस्वी असतो, तेव्हा महिलांना असं ट्रोलिंग सहन करावं लागतं.