Tirupati Prasad Controversy News: आंध्रप्रदेशच्या तिरुमला तिरुपती मंदिरात प्राण्यांची चरबी असलेले लाडू प्रसादात दिले गेल्याचा वाद निर्माण झाल्यानंतर हा विषय राष्ट्रीय पातळीवर गाजत आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याप्रकरणाची वाच्यता केल्यानंतर प्रसादाची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यामध्ये प्रसादात प्राण्यांची चरबी, बीफ टॅलो वापरले गेल्याचे समोर आले. तसेच उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी यानंतर राष्ट्रीय पातळीवर ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ स्थापन करण्याची मागणी केली. या मागणीनंतर दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज यांनी सडेतोड मत मांडले आहे. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी दोषींची चौकशी करून कडक कारवाई करावी, पण या विषयाला राष्ट्रीय पातळीवर नेण्याची काय गरज आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला.
उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हणाले की, गेल्या सरकारच्या कार्यकाळात तिरुपती बालाजी प्रसादमध्ये प्राण्यांची चरबी (माशाचे तेल, डुकराचे मांस आणि गोमांस चरबी) मिसळल्याच्या निष्कर्षांमुळे आम्ही सर्वजण खूप व्यथित झालो आहोत. संपूर्ण भारतातील मंदिरांशी संबंधित सर्व समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ स्थापन करण्याची वेळ आली आहे. माझा विश्वास आहे की, ‘सनातन धर्माचा’ कोणत्याही स्वरूपात होणारा अपमान थांबवण्यासाठी आपण सर्वांनी त्वरित एकत्र आले पाहिजे.
पवन कल्याण यांच्या या आवाहनानंतर प्रकाश राज यांनी एक्सवर पोस्ट करून टीका केली आहे. ते म्हणाले, “प्रिय मित्रा, तू ज्या राज्याचा उपमुख्यमंत्री आहेस, त्या राज्यात ही घटना घडली आहे. कृपया तू चौकशी लाव. या घटनेमागे दोषी कोण आहेत, ते शोधून त्यांना कडक शासन कर. पण हा विषय राष्ट्रीय पातळीवर तापवण्यात काय अर्थ आहे. आधीच देशात कमी धार्मिक तणाव आहे का… (याबद्दल तुझ्या दिल्लीतील मित्रांचे आभार)”
अभिनेते प्रकाश राज यांनी याआधीही अनेकदा भाजपाची धोरणे आणि धार्मिक कट्टरतावादावर परखड मत व्यक्त केलेले आहे. समाजातील विविध घटना आणि राजकीय घडामोडींवर ते अनेकदा आपली मते सोशल मीडियावर मांडत असतात. कुणाचीही भीडभाड न ठेवता रोखठोक मतप्रदर्शन करण्यावरून त्यांच्यावर अनेकदा टीकाही होते. तसेच सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जाते. मात्र टीकेला आणि ट्रोलिंगला न घाबरता प्रकाश राज उजव्या विचारसरणीच्या विरोधात बोलत असतात.
प्रकाश राज हे हिंद विरोधी आणि राष्ट्र विरोधी असल्याचाही ठपका त्यांच्यावर अनेकदा ठेवण्यात आलेला आहे.