सरकारवर खुलेपणानं टीका करणारे आणि समाजातील प्रत्येक गंभीर प्रश्नावर बेधडकपणे आपलं मत मांडणारे अभिनेते प्रकाश राज आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत. नववर्षाच्या सुरूवातीला आपण २०१९ ची निवडणुक लढवणार असल्याचं प्रकाश राज यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केलं आहे. कोणत्या पक्षाकडून निवडणूक न लढवता आपण अपक्ष ही निवडणूक लढणार असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गेल्या वर्षभरात मोदी आणि भाजप सरकावर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली. इतकंच नाही तर मी भाजपवर टीका करतो म्हणून मला कोणी काम देत नाही असंही ते म्हणाले होते. कलाकारांची आणि विचारवंताची समाजात होणाऱ्या गळचेपीवरही त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टिका केली होती.
‘ते म्हणतात की मी हिंदूच्या विरोधात आहे, पण मी हिंदूच्या विरोधात नसून मी मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात आहे. इतकंच नाही तर माझ्यामते मोदी आणि अमित शाह हे हिंदू नाहीच’ अशी बोचरी टीका त्यांनी जानेवारी २०१८ मध्ये ट्विटद्वारे केली होती. त्यांच्या ट्विटमुळे अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर लक्ष्य केलं. मात्र तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

‘ही वेळ जनतेसाठी काहीतरी करून दाखवण्याची आहे. यासाठी मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे असं म्हणत अब की बार जनता की सरकारचा नारा देत’ त्यांनी ही घोषणा केली आहे. रजनीकांत कमल हसन नंतर गेल्या वर्षभरात राजकारणात प्रवेश केलेले ते तिसरे दाक्षिणात्य अभिनेते आहे.

Story img Loader