बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर गणेश मूर्तींचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील एका मूर्तीला खाकी पॅन्ट घातलेली आहे, तर काही मूर्तीबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळाही दिसत आहे. आता अशा मूर्तींमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत का, असा सवाल त्यांनी केला आहे. प्रकाश राज यांचं हे ट्वीट चांगलंच व्हायरल झालं असून नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
प्रकाश राज यांनी शेअर केलेले फोटो हे गणपतीचे आहेत. काही फोटोंमध्ये गणपती बाप्पांनी खाकी पँट घातली आहे. ते आरएसएसच्या गणवेशात ध्वजवंदन करताना दिसत आहेत. तर काहींमध्ये गणपतीच्या मुर्तीसमवेत पीएम मोदींची मूर्ती बसवण्यात आली आहे. दरम्यान, मूर्तींपैकी एका गणेशाच्या हातात मशीनगन दाखवण्यात आली असून त्यावर KGF 2 लिहिलंय. त्याचप्रमाणे, आणखी एक मूर्ती ‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनच्या पोजमध्ये दाखवण्यात आली आहे.
प्रकाश राज यांच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स वर्षाव केलाय. काही युजर्स त्यांचं समर्थन करताना दिसत आहेत, तर काही जण त्यांच्यावर टीका करत आहेत. तर, एका युजरने लिहिलंय की, ‘त्यांच्या भावना तेव्हाच दुखावल्या जातात, जेव्हा आपण त्याच्या कृत्याबद्दल प्रश्न विचारतो…’ , आणखी दुसऱ्या युजरने म्हटलंय की, ‘जर तुम्ही हिंदू असाल आणि या मूर्तींमुळे तुमच्या भावना दुखावल्या जात असतील, तर तुम्ही कायदेशीर पावलं उचला, पण जर तुम्ही आस्तिक नसाल तर बोलू नका.’
प्रकाश राज यांच्या या ट्वीटने चांगलीच चर्चा रंगली आहे. काही नेटकरी प्रकाश राज यांचं समर्थन करत आहेत, तर काही जण त्यांना हिंदूंच्या सणांना लक्ष्य करणं सोडून द्या, असं म्हणत आहेत.