अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. यानंतर प्रशांत दामले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्याची नाट्यगृहांची अवस्था, नाटक व्यवसाय यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल होतील असं प्रशांत दामले यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे याआधी काय झालं ते उगाळत न बसता नव्या जोमाने कामाला लागणार आहोत असंही प्रशांत दामलेंनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या सरकारचंही प्रशांत दामलेंनी कौतुक केलंय.

काय म्हणाले प्रशांत दामले?

मी जेव्हा अध्यक्ष झालो नव्हतो तेव्हाही मी नाट्यगृहांच्या अवस्थेबाबत मी महापालिकांना भेटत होतो. माझ्या परिने मी विनंती करत होतो. आता मंत्री उदय सामंत हे आमचे ट्रस्टी आहेत. तसंच शरद पवार हे देखील आमचे ट्रस्टी आहेत. ते आम्हाला चांगल्या कामात मदत करतील याचा मला विश्वास वाटतो. तसंच निवडणुकीपुरतेच जे काही मतभेद होते ते आमच्यात तुम्हाला दिसले. आता ते संपले आहेत. गटतट काही नाही. आम्ही साठजण एकत्र मिळून काम करणार आहोत असंही प्रशांत दामले यांनी म्हटलं आहे.

१०० व्या नाट्यसंमेलनाची चर्चाही सुरु झाली आहे. त्यासंदर्भात आम्ही पावलं उचलत आहोत. महिनाभरात आम्ही तुम्हाला त्याविषयीची माहिती देऊ असं प्रशांत दामलेंनी पत्रकारांना सांगितलं. आम्ही आता पान उलटलं आहे. पान उलटलं की मागे वळून बघत नाही. मागे काय झालं त्यात आम्हाला अजिबात रस नाही. आता पुढे चांगलं काम करायचं आहे.

आपल्या सांस्कृतिक मंत्र्यांना मी चांगलं नाट्यगृह काय? त्याची संकल्पना दिली आहे. आता परिषदेच्या माध्यमातून आम्ही वेगळा प्रयत्न करु शकू. आत्ताचं जे सरकार आहे ते ऐकणारं सरकार आहे त्यामुळे पटापट काम होईल याची मला खात्री आहे असंही प्रशांत दामलेंनी स्पष्ट केलं

Story img Loader