Prashant Damle Mother Vijaya Damle Passes away : मराठी रंगभूमीवरचं नाट्यप्रयोगांच्या विक्रमांचे विक्रम रचणारे अभिनेते प्रशांत दामले यांना मातृशोक झाला आहे. प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले यांचं आज सकाळी १० च्या सुमारास निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. प्रशांत दामले हे मुंबई बाहेर होते. त्यांना जेव्हा आईच्या निधनाचं वृत्त समजलं तेव्हा ते तातडीने मुंबईत पोहचले. विजया दामले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रशांत दामले हे मराठी नाट्य, चित्रपटसृष्टीतले अत्यंत नावाजलेले अभिनेते आहेत. मराठी रंगभूमीवर नाटकांच्या प्रयोगांचे विक्रम करण्यासाठी ते ओळखले जातात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी १२ हजार ५०० प्रयोगांचा टप्पा ओलांडला आहे. प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनचं कामही ते पाहतात. ८ सप्टेंबरपासून त्यांचा विदेश दौराही सुरु होणार आहे. अशातच त्यांच्या आई विजया दामले यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
प्रशांत दामले हे कायमच आपल्या यशाचं श्रेय हे आपल्या आईला आणि पत्नी देत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा १२ हजार ५०० प्रयोगांबद्दल सत्कारही करण्यात आला. त्यावेळीही त्यांनी आई आणि पत्नी यांचा आपल्या यशात मोठा वाटा आहे असं म्हटलं होतं. प्रशांत दामले हे प्रदीर्घ काळापासून रंगभूमीवर कार्यरत आहेत. वैविध्यपूर्ण प्रयोग करणं हे प्रशांत दामले यांचं वैशिष्ट्य आहे.