राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर आता अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चर्चेत आहे. या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपा-शिंदे गट यांच्या युतीकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मुरजी पटेल यांच्या प्रचार रॅलीमध्ये मराठमोळा अभिनेता प्रथमेश परबही सहभागी झाला होता.
प्रथमेश परबने पटेल यांच्या रॅलीत हजेरी लावत सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं. “मुरजी पटेल हे माझे काकाच आहेत. ते कायम मदत करण्यासाठी तत्पर असतात. मी कलाकार आहे म्हणून नव्हे तर इतर सामान्य माणसांच्या मदतीसाठीही ते कायमच धावून जातात. मी चाळीत राहायचो तेव्हा त्यांनी तेथील अनेक प्रश्न सोडवले आहेत. त्यांचे आमच्यावर खूप उपकार आहेत”, असं प्रथमेश एबीपी माझाशी संवाद साधताना म्हणाला.
हेही वाचा >> आलिया लग्नाआधीच गरोदर होती? बहीण शालीन भट्ट म्हणते…
पुढे तो म्हणाला, “मी याच मतदारसंघातील रहिवाशी आहे. रमेश लटके हे सुद्धा माझ्या फार जवळचे होते. या दोघांमध्येही नेहमीच स्पर्धा असायची. आताची निवडणूकही अटीतटीची होईल असं दिसत आहे. ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांच्यापैकी ज्याला मतदारांचा पाठिंबा मिळेल ते या भागाचे नवीन आमदार होतील. मी कायमच मुरजी काकांना पाठिंबा दर्शविला आहे. आताही मी त्यांच्यासाठी इथे आलो आहे”.
हेही वाचा >> शिल्पा शेट्टीच्या चाळणीने चेहरा लपवल्यामुळे राज कुंद्रा ट्रोल, नेटकरी म्हणाले…
प्रथमेश परबने चाळीत राहत असताना मुरजी पटेल यांना त्याला केलेल्या मदतीचाही उल्लेख बोलताना केला. “मुरजी काकांचा काल मला फोन आला होता. त्यांनी कायमच आम्हाला मदत केली आहे. चाळीत असताना माझ्या घरात गटाराचं पाणी यायचं. ही समस्याही मुरजी काकांनी सोडवली. म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलो आहे”, असंही प्रथमेश म्हणाला.
प्रथमेश परबने ‘बालक पालक’ चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. ‘टाइमपास’ चित्रपटात तो पहिल्यांदाच मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसला. यातील ‘दगडू’ या भूमिकेमुळेच त्याला लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाचा तिसरा भागही काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. त्याने मराठीबरोबरच हिंदी चित्रपटातही काम केलं आहे.