कॉलेज आठवणींचा कोलाज : प्रियदर्शन जाधव, अभिनेता
माझं दहावीपर्यंतचं शिक्षण कोल्हापुरात झालं. कोल्हापुरात मी दहावीत फेल झालो. नंतर मग मी ऑक्टोबरची परीक्षा देऊन मुंबईच्या रुपारेल कॉलेजला अॅडमिशन घेतलं. रुपारेल कॉलेजला असताना माझे असंख्य मित्र झाले. जे आज खूप मोठय़ा पदावर आहेत. पण तरीही काही नावं अशी आहेत की ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. हा लेख पूर्ण होणार नाही.
पहिलं नाव म्हणजे कपिल भोपटकर ज्याने ‘झेप’ एकांकिका दिली, दुसरं दीपक राजाध्यक्ष, चेतन दातार, गोडबोले सर, आणि कुलकर्णी सर. या पाच माणसांनी माझं आयुष्य बदलून टाकलं. मला पराकोटीचा कॉन्फिडन्स दिला. माझ्यासारख्या कोल्हापूरहून आलेल्या नवशिक्या मुलाला भाषेचं महत्त्व जाणवून दिलं. पुस्तकांची गोडी निर्माण करून दिली. नाटक या कला प्रकाराबरोबरच इतर कला प्रकारांची आवड निर्माण करून दिली आणि त्यात अविस्मरणीय भाग म्हणजे रुपारेलमध्ये अकरावीतच मला अभिनय करायची संधी ‘भिंत’ नावाच्या एकांकिकेत मिळाली. पहिलीच एकांकिका आणि अगदीच छोटासा चित्रकाराचा रोल होता. तो मी केला. आणि एकांकिका संपल्यावर अनेक लोक मला येऊन भेटले आणि मला म्हणाले फार चुणचुणीत आणि छान काम केलंस. मला असं वाटतं की, ज्यांनी मला हे प्रोत्साहन दिलं ते आज खूप मोठय़ा पदावर आहेत, खूप मोठे अभिनेते आहेत, खूप मोठे लेखक दिग्दर्शक आहेत. केवळ त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी इथवर पोचू शकलो आहे.
कॉलेजमध्ये मी अकरावीपासूनच कशात नव्हतो, पण नाटकात मात्र निश्चित होतो. युथ फेस्टिव्हल असेल, आयएनटी असेल वा कुठलीही आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा असेल. त्यात मी आवर्जून भाग घ्यायचो. आणि अनेक दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. त्यातली अत्यंत स्मरणात राहिलेली गोष्ट म्हणजे यशस्वी एकांकिका तर आहेच, पण त्याचबरोबर अयशस्वी एकांकिका जेव्हा व्हायच्या जेव्हा एकांकिका चांगली व्हायची नाही किंवा नंबरात यायची नाही. त्या वेळी अभ्यास करण्याची एक गोडी निर्माण होऊ लागली. एकांकिका स्पर्धा जिंकण्यापेक्षा नाटक कसं प्रगल्भ करता येईल. आपलं नाटक कसं सकस असेल? आपलं नाटक लोकांच्या किती आत शिरेल? याचा विचार जास्त होऊ लागला आणि आपसूकच. स्पर्धा जिंकणं, हरणं याच्या पलीकडचा विचार होऊ लागला. मला वाटतं ही सगळ्यात मोठी रुपारेल कॉलेजची देणं आहे.
डी.जी. रुपारेल कॉलेजला मला सरळ अकरावी बारावीला अॅडमिशन मिळेना तेव्हा मी कोर्स केला. जो रिपेअरिंगचा कोर्स आहे. ज्यात मिक्सर, टीव्ही, रेडिओ. गोडबोले सरांच्या कृपेमुळे मला तिकडे अॅडमिशन मिळाली. मी अकरावी-बारावी पास झालो आणि त्या नंतर मग मी इतिहास आणि मराठी साहित्य यात मी डिग्री घेतली. त्यामुळे कॉलेज आठवलं की मला एवढंच आठवतं की या कॉलेजने आम्हाला समृद्ध केलं. माणूस म्हणून मोठं केलं. कॉलेजच्या पहिल्या दिवशी जेव्हा मी पहिलं पाऊल टाकलं तेव्हा मी मुंबई बाबतीत अनभिज्ञ होतो. मला काहीही माहिती नव्हतं. मुंबईत मी नवा नवा होतो. या मुंबईने मला सामावून घेतलंय, या कॉलेजने मला सामावून घेतलं. मित्रांनी, गुरुजनांनी, सगळ्यांनी मला आपलंसं केलं. माझे वडील मला सोडायला आले होते कॉलेजच्या पहिल्या दिवशी. तेवढं मला आठवतंय. कॉलेजचा शेवटचा दिवस जेव्हा होता. तेव्हा मात्र अगदीच. असं वाटलं, अरे बापरे आता या जगातून आपल्याला बाहेर पडायचंय. आणि ते तसं सोप्पं नसतं. कॉलेजमधून बाहेर पडणं माझ्यासाठी खूप त्रासदायक झालं. मी रुपारेलसाठी एकांकिका बसवत होतो. आणि काही कारणांनी मला असं सांगण्यात आलं की, यापुढे तू रुपारेलसाठी एकांकिका बसवायची नाहीस. कधीच. त्या दिवसापासून आजतागायत तसा रुपारेलमध्ये मी पाय ठेवलेला नाहीये. फक्त सरांना भेटण्यासाठी ठेवलेला आहे.
कॉलेजमधल्या मारामाऱ्या थांबल्या, पण खवयेगिरी मात्र काही सुटली नाही. आज रुपारेलच्या आसपास किंबहुना दादरमध्ये जेवढी हॉटेल्स आहेत- व्हेज, नॉन-व्हेज, चिकन, मटण, मच्छी- जेवढी हॉटेल्स आहेत तेवढी आम्ही पालथी घातली आहेत. फक्त त्या काळी पण एक चोरी असायची. त्याकाळी कुणाकडे मोबाइल नव्हता. त्यामुळे घरी फोन करायचाय, असं सांगून प्रत्येकी एक एक रुपया घ्यायचो असं प्रत्येक वर्गात जाऊन एक एक रुपया कलेक्ट करायचो. फोन करायला एक रुपया लागत असल्याने कुणी सहसा नाही म्हणायचं नाही. मग एक एक रुपया जमा करायचो. भरपूर कॅश जमा व्हायची. ९८-९९ सालात दोनशे ते दोनशे वीस रुपये जमा व्हायचे. मग त्या दोनशे रुपयांची आम्ही पार्टीसुद्धा करायचो. अशी आम्ही चापलूस चोरी असलेली खवयेगिरी केलीये. आपल्याच कॉलेजमधून आपल्याला काढलं जाणं किंवा आपल्याला सांगितलं जाणं की, आता तुझी गरज नाहीये. याचं मला दु:ख झालं. पण आजही ते दु:ख मी स्वत: सोबत घेऊन आहे पण.. पण.. जे झालं ते चांगलंच झालं. त्यानं मला कॉलेजमधून बाहेर पाऊल ठेवताना पण फार मोठी शिकवण दिली की, आतलं जगच असं असेल तर बाहेरचं जग कसं आहे. त्यामुळे मी हुशार झालो. आणखी काम करू लागलो. आणि आणखी ही पुढे काम करेन.
(शब्दांकन : मितेश जोशी)