वडापाव म्हणजे महाराष्ट्राची शान. जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी उत्कृष्ट वडापाव हा महाराष्ट्रातच मिळतो असं म्हणणारी अनेक लोकं आपल्याला सापडतील. अगदी सर्वसामान्यांपासून ते प्रतिष्ठित व्यक्तींपर्यंत, वडापाव खाण्याचा मोह कोणीही आवरू शकत नाही. आज फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात वडापाव हा लोकप्रिय बनला आहे. आज २३ ऑगस्ट म्हणजे ‘जागतिक वडापाव दिन.’ या जागतिक वडापाव दिनानिमित्त अमोल कोल्हेंनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कोल्हापूर, पुणे, मुंबईतल्या उत्तम वडापाव मिळणाऱ्या त्यांच्या आवडत्या ठिकाणांबद्दल लिहित वडापाव त्यांना किती प्रिय आहे हे सांगितलं आहे. हे सांगताना त्यांनी त्यांच्या स्ट्रगलच्या दिवसांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अभिनेत्री सोनाली खरेची नवी इनिंग सुरु, लंडनमध्ये सुरू केले काम

जागतिक वडापाव दिनानिमित्त एक पोस्ट शेअर करत अमोल कोल्हे यांनी लिहिलं, “वडापाव…अनेक आठवणी. शाळेत हट्टाने खाल्लेला गाडीवरचा वडापाव, मग पुण्यात आल्यावर बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर जोशी वडेवाले.
आणि मग स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईत स्थिरावताना कधी धावपळीतला ब्रंच तर कधी खिशाला परवडणारं पूर्णब्रह्म! स्थिरावल्यावर डाएट, वजन, पथ्य याकडे पाहून टाळलेला वडापाव कोणेकाळी आधार होता या विचारानं हसू येतं. रिमझिम पाऊस, गरमागरम वडापाव, तळलेली मिरची आणि फर्मास चहा. स्थळ कुठलंही असो या मेन्यूला तोड नाही!” त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून त्यांचे चाहतेही त्यावर कमेंट करत त्यांचे वडापावबद्दलचे प्रेम व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा : अभिनेत्री मुक्ता बर्वेचे रंगभूमीवर पुनरागमन, केली नव्या नाटकाची घोषणा

दरम्यान, अमोल कोल्हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा प्रेक्षकांसमोर मांडायला सज्ज झाले आहेत. ते तीन शिवकालीन चित्रपटांची निर्मिती करणार आहेत. ‘शिवप्रताप’ या चित्रपटमालिकेअंतर्गत ‘वाघनखं’, ‘वचपा’ आणि ‘गरूडझेप’ अशा शीर्षकांचे हे चित्रपट असतील. ‘वाघनखं’, ‘वचपा’ आणि ‘गरुडझेप’ हे जगदंब क्रिएशन्सची निर्मिती असलेले तिन्ही चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये चित्रीत आणि प्रदर्शित केले जाणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor producer amol kolhe recalls college days and express his love for vadapav rnv