हिंदीतही प्रेमपटांचा नायक होण्याची इच्छा बाळगून आलेल्या अभिनेता आर. माधवनने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूड दोन्हीकडे वैविध्यपूर्ण भूमिका करीत आपली ओळख निर्माण केली. लाघवी चेहऱ्याचा आर. माधवन ‘शैतान’ साकारेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. मात्र दिग्दर्शक विकास बहल, अभिनेता अजय देवगणला याचं श्रेय द्यायला हवं. त्यांनी तसा विचार केला आणि आज ‘शैतान’मधल्या माझ्या खलनायकी भूमिकेसाठीही माझं कौतुक होतं आहे, असं सांगणाऱ्या माधवनचा ‘हिसाब बराबर’ हा नवीन चित्रपट ‘झी ५’ या ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. यानिमित्ताने, सध्या हिंदी चित्रपटांच्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपटांना मिळणाऱ्या यशाविषयी बोलताना त्याने दक्षिणेकडील चित्रपटकर्मी हे तंत्रज्ञानात सरस झाले आहेत, तर त्यात अग्रसेर असलेल्या बॉलिवूडला आपल्या कथामांडणीच्या शैलीत आमूलाग्र बदल करावा लागणार आहे, असं मत व्यक्त केलं.

‘दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीत कलाकारांची, विषयांची, तंत्रज्ञांची देवाणघेवाण ही फार जुनी आहे. त्याकाळी जितेंद्रसारख्या गाजलेल्या अभिनेत्याने दक्षिणेत चित्रपट केले. हेमामालिनी आणि श्रीदेवीसारखे अनेक कलाकार हिंदी – दाक्षिणात्य चित्रपटात एकाचवेळी काम करत होते. आता याची चर्चा होते आहे, कारण तमिळ किंवा एकंदरीतच दाक्षिणात्य चित्रपट हे सध्या हिंदीपेक्षा अधिक आर्थिक व्यवसाय करतायेत. देशभरात मोठ्या प्रमाणावर हे चित्रपट प्रदर्शित केले जातात आणि प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी खेचतायेत. हा बदल गरजेचाच होता, तसा तो प्रत्येक प्रांतीय चित्रपट व्यवसायाने अनुभवायलाच हवा’, असं स्पष्ट मत त्याने आर. माधवनने व्यक्त केलं. पण म्हणून दोन्हीकडच्या प्रेक्षकांचा दृष्टिकोन वेगळा आहे, असं त्याला वाटत नाही. ‘माझ्या मते देशभरातला प्रेक्षक हा मनोरंजनाच्या अपेक्षेनेच चित्रपट पाहात असतो. मी दोन्हीकडे मुख्य प्रवाहात काम केलेलं आहे. दोन्हीकडे जसजसे नवनवीन दिग्दर्शक, लेखक, कलाकार येत राहतील तसे चांगले बदल आपसूकच घडतील’, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

सर्वसामान्य नायकच जवळचा वाटतो….

‘हिसाब बराबर’च्या निमित्ताने माधवनने पहिल्यांदाच विनोदी चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शक अश्वनी धीर यांच्याबरोबर काम केलं आहे. अश्वनी यांची ‘ऑफिस ऑफिस’ ही गाजलेली मालिका, त्यांचे चित्रपट यामुळे त्यांची दिग्दर्शन शैली परिचयाची होतीच, पण या चित्रपटाचा जो कथाविषय आहे तो काही काळ आपल्याही डोक्यात घोळत होता, असं त्याने सांगितलं. ‘तुमच्या बँकेच्या खात्यात किती पैसे आहेत? असं तुम्हाला विचारलं तर तुम्हाला निश्चित सांगता येणार नाही. पूर्वी आपल्याला पासबुकच्या माध्यमातून ते समजायचं. आता आपल्या खात्यातून रोज पैसे कोणाला ना कोणाला जात असतात किंवा त्यांच्याकडून आपल्या खात्यात जमा होतात. अमूक एका अॅपसाठीची रक्कम, तमूक एका गोष्टीसाठीचा दंड तुमच्या खात्यातून वजा झाला आहे, असे सारखे संदेश आपल्याला मिळत राहतात. माझं खातं इतक्या जणांना सहजपणे का उपलब्ध होतं आहे? हा प्रश्न मलाही छळत होता. कोणीही याचा गैरफायदा घेऊ शकतं. आणि नेमकं त्याच वेळी दिग्दर्शक अश्वनी धीर माझ्याकडे ‘हिसाब बराबर’ची कथा घेऊन आले. आपल्या बँक खात्यातून अगदी नाममात्र वाटावी इतकी रक्कम सातत्याने बाहेर जाते आहे, हे लक्षात आल्यानंतर चित्रपटाचा नायक या प्रकरणाचा शोध घ्यायचा ठरवतो. आणि या छोट्याशा रकमेतून कुणीतरी मोठा आर्थिक घोटाळा केला आहे हे लक्षात आल्यानंतर तो हा बिघडलेला हिशोब सरळ करतो, अशा स्वरूपाची ही कथा आहे’, असं त्याने स्पष्ट केलं. एकतर हा विषय आज प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्याशी निगडीत आहे. आणि एकाचवेळी हलक्याफुलक्या पण काहीशा उपरोधिक पद्धतीने त्यांनी हा विषय मांडला आहे. मी आजवर अशाच सामान्य माणसाच्या वास्तवदर्शी व्यक्तिरेखा आणि कथा असलेल्या चित्रपटांवर भर दिला आहे, असंही त्याने सांगितलं.

२५ वर्षांनंतर प्रेक्षक म्हणतायेत ‘रहना है तेरे दिल में’

‘रहना है तेरे दिल में’ ही एकाअर्थी दुखरी आठवण असल्याचं तो म्हणतो. गेल्या वर्षी पुन्हा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भरपूर कमाई केली. त्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच २५ वर्षांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाची आठवण त्याने सांगितली. ‘तमिळमध्ये चित्रपट हिट ठरला, पण बॉलिवूडमध्ये ‘फ्लॉप’चा ठपका बसला. तेव्हा खरंतर मी खूप निराश झालो होतो. या चित्रपटासाठी मी मंदिरात गेलो, काय काय नाही केलं… पण अगदी मनापासून केलेला हा चित्रपट अपयशी ठरला. त्यावेळी जे जन्मालाही आले नव्हते ती ‘जेन झी’ पिढी आज चित्रपटगृहात हा चित्रपट पाहून त्यातल्या गाण्यांवर थिरकते काय आणि आनंद घेते काय… ते पाहिल्यावर मला इतकंच वाटलं की हेच या चित्रपटाचं नशीब असावं. प्रदर्शित झाला तेव्हा ‘रहना है तेरे दिल में’ हा चित्रपट कोणी पाहिला नाही. नंतर चित्रपट आणि गाणी इतकी लोकप्रिय झाली की आज २५ वर्षे उलटून गेली तरी लोक आवर्जून हा चित्रपट पाहतात. एका कलाकारासाठी हा खरोखरच विलक्षण अनुभव आहे की दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेल्या त्याच्या पहिल्या चित्रपटाची आज इतक्या वर्षांनी चर्चा होते आहे’, असं त्याने सांगितलं.

इन्स्टाग्रामवरूनही ‘स्टार’ जन्माला येत आहेत…

‘पूर्वी फक्त चित्रपट एकच माध्यम असल्यामुळे लोकांसाठी आशयही मर्यादित होता आणि फार कमी कलाकारांना संधी मिळत होती. तेच तेच कलाकार वर्षानुवर्षं चित्रपटाचा पडदा व्यापून असायचे. आता दूरचित्रवाहिनी तर आहेच शिवाय, ओटीटी, युट्यूब आहे. हल्ली तर इन्स्टाग्रामवरूनही ‘स्टार’ जन्माला येत आहेत. आणि या सगळ्यांबरोबर आजच्या कलाकारांची स्पर्धा आहे’, या वास्तवाकडे लक्ष वेधताना हल्ली आपली स्पर्धा नेमकी कोणाबरोबर आहे हे शोधण्यातच कलाकारांचा वेळ खर्ची पडतो आहे. नेमका शत्रू कोण हे समजलं तर आपलं पुढचं पाऊल निश्चित करता येईल, अशा मार्मिक शब्दांत त्याने मनोरंजन विश्वातील बदलांमध्ये फसलेल्या कलाकारांची सद्यास्थिती वर्णन केली.

मराठी चित्रपटांत आधुनिक मराठी माणूस दिसायला हवा…

‘माझी पत्नी महाराष्ट्रीय असल्याने मराठी चित्रपट मी मोठ्या प्रमणावर पाहतो आणि मी मराठी चित्रपटांचा चाहता आहे’, असं माधवन म्हणतो. मराठी कलाकार हे सहजअभिनय करतात. मी खूप मराठी चित्रपट पाहिले आहेत, पण मला वाटतं आता मराठी चित्रपटांनीही कात टाकायला हवी. मराठी माणूस जगभरात नावाजला गेला आहे, तरी मराठी चित्रपटात अजूनही त्याच जुन्या पद्धतीचं, कथांचं चित्रण अधिक आढळतं. आपण अजूनही त्याच जुन्या महाराष्ट्राविषयी बोलतो आहोत, आधुनिक महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांचं प्रतिबिंब मराठी चित्रपटात उमटायला हवं, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच मला एखादी चांगली भूमिका करायला मिळाली तर मी निश्चितच मराठी चित्रपट करेन, असंही त्याने विश्वासाने सांगितलं.

ओटीटीवर येणारा मी पहिला चित्रपट कलाकार…

‘कलाकार म्हणून आपला चित्रपट दर शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित व्हावा, असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण ओटीटीमुळे तुमचा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. थोडं शोधलंत तर ओटीटीवर पहिल्यांदा ‘ब्रेथ’सारखी वेबमालिका करणारा मी पहिला चित्रपट कलाकार होतो. त्यामुळे या नव्या माध्यमाचं मला कौतुकच आहे’, असंही त्याने सांगितलं.

Story img Loader