प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांना लखनऊच्या खासदार आमदार न्यायालयाने २६ वर्ष जुन्या एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी राज बब्बरला ८,५०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात राज बब्बर यांच्यावर मतदान अधिकाऱ्याला मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे. राज बब्बर यांनी या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले. मात्र, या प्रकरणी न्यायालयाने राज बब्बर यांना अंतरिम जामीनही मंजूर केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हे संपूर्ण प्रकरण २ मे १९९६ चे आहे. जेव्हा राज बब्बर समाजवादी पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत होते. वजीरगंजमधील एका मतदान अधिकाऱ्याने राज बब्बर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मतदान अधिकारी श्री कृष्ण सिंह राणा यांनी सपा उमेदवार राज बब्बर आणि अज्ञात लोकांविरुद्ध लखनऊच्या वजीरगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. राज बब्बर आणि त्यांच्या समर्थकांनी बूथमध्ये घुसून त्यांना मारहाण केल्याचे मतदान अधिकाऱ्याने सांगितले होते.
निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण
सपाचे उमेदवार राज बब्बर आणि शिवसिंह यादव आपल्या पाच-सात साथीदारांसह मतदान केंद्रावर आले आणि बनावट मतदान करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. एवढचं नाही या लोकांनी मतदान अधिकारी श्री कृष्ण सिंह राणा आणि शिवकुमार सिंह यांना शिवीगाळ करत मारहाणही केली. या प्रकरणी पोलिसांनी ३ सप्टेंबर १९९६ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. मात्र, खटल्यादरम्यान शिवकुमार सिंह यांचा मृत्यू झाला.वजीरगंज पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, सपा उमेदवार राज बब्बर यांच्या आरोपांना मतदान अधिकाऱ्याने आक्षेप घेतल्यावर ते भडकले. यानंतर राज बब्बर आणि त्यांच्या समर्थकांनी मतदान अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना मारहाण केली, ज्यात अनेक अधिकारी जखमीही झाले.
राज बब्बर हे काँग्रेसचे नेते आहेत. यापूर्वी ते काँग्रेस पक्षाचे यूपी प्रदेशाध्यक्षही होते. न्यायलयाच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे राज बब्बर यांनी सांगितले. १९८९ मध्ये राज बब्बर यांनी व्हीपी सिंह यांच्या नेतृत्वाखाली जनता दलात प्रवेश केला होता. मात्र, नंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. १४ व्या लोकसभा निवडणुकीत ते फिरोजाबादमधून समाजवादी पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले. २००६ मध्ये सपामधून निलंबित झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.