अभिनेता राजकुमार रावने त्याच्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:च स्थान निर्माण केलंय. हटके भूमिका साकारत राजकुमार रावने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. राजकुमार रावने लव सेक्स और धोका, गँग्स ऑफ वासेपूर २, तलाश, यासारख्या अनेक चित्रपटातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाहिद या चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. नुकतंच राजकुमार रावने एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीबद्दल भाष्य केले आहे. ‘चित्रपटसृष्टीत घराणेशाही ही कायम असणार आहे’, असे राजकुमार रावने यावेळी म्हटलं.
राजकुमार रावने नुकतंच ‘इंडिया टुडे’ ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, “चित्रपटसृष्टीत घराणेशाही ही नेहमीच असेल. पण आता अनेक संधीदेखील निर्माण होत आहेत. माझे अनेक मित्र जे माझ्यासोबत अभ्यास करायचे त्यांनाही आता ओटीटीमुळे ओळख मिळत आहे. जयदीप अहलावतने पाताल लोक मध्ये फार छान काम केले आहे . तर स्कॅम १९९२ मध्ये प्रतीक गांधीने चांगले काम केले आहे. त्यामुळे सिनसृष्टीत घराणेशाही ही नेहमीच असणार आहे. पण तुमचे काम, टॅलेंट आपोआपच बोलेल.”
“चित्रपट हिट होण्याचा फॉर्म्युला कोणालाही माहिती नाही. त्यासाठी तुम्हाला सातत्याने प्रयत्न करत राहावे लागेल आणि त्यानंतर त्या गोष्टी नशिबावर सोडाव्या लागतील. दाक्षिणात्य चित्रपट हिट कसे होतात याचा मी विचार केलेला नाही. कदाचित ते चांगले चित्रपट असावेत. त्यासाठी ते फार मेहनत घेतात”, असेही त्याने सांगितले.
पाहा व्हिडीओ –
“पण एखादा चित्रपट हा अनेक गोष्टीतून जातो. काही वर्षांपूर्वी आम्ही स्वित्झर्लंडमध्ये गाण्यांचे शूटिंग करायचो आणि आता आम्ही छोट्या छोट्या शहरात शूटींग करण्यास सुरुवात केली आहे. मी एक अभिनेता म्हणून असे चित्रपट करतो ज्याचा मला अभिमान वाटला पाहिजे. त्यामुळे मी त्याचप्रकारचे चित्रपट निवडतो. माझ्या चित्रपटांसाठी मला कोणत्याही कळपाचा भाग व्हायचे नाही. माझ्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई केली नाही तरीही मला चालेल”, असेही तो म्हणाला.
राजकुमार राव आणि पत्रलेखा ‘या’ अलिशान रिसॉर्टमध्ये घेणार सप्तपदी, एका रात्रीचे भाडे माहितीये का?
राजकुमार लवकरच अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘हिट: द फर्स्ट केस’ या चित्रपटात झळकणार आहे. शैलेश कोलानुचा हा थ्रिलर चित्रपट तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट येत्या १५ जुलैला प्रदर्शित होत आहे. तसेच सध्या तो जान्हवी कपूरसोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’चे शूटिंग करत आहे.