कलाकार आणि त्यांची मुलं ही नेहमीच चर्चेचा विषय बनतात. अनेक स्टारकिड्स त्यांच्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून मनोरंजनसृष्टीत नशीब आजमावत आहेत. तर, दुसरीकडे काही स्टारकिड्स या ग्लॅमरस दुनियेपासून लांब राहून वेगळ्या क्षेत्रात करिअर करीत आहेत. त्यातच आता एका लोकप्रिय अभिनेत्याची लेक भारतीय सैन्यात भरती होणार आहे.
भारतीय सैन्यात भरती होणाऱ्या या लेकीचे वडील म्हणजे भोजपुरी सुपरस्टार व भाजप खासदार रवी किशन आहेत. रवी किशन यांची मुलगी इशिता शुक्ला हिने तिचे स्वप्न पूर्ण केले आहे. आता लवकरच ती सैन्यात भरती होण्यासाठी सज्ज झाली आहे. ही बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
सुप्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावलाने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. त्याने रवी किशन आणि त्यांच्या लेकीचा एक फोटो पोस्ट केला आणि लिहिलं, “भोजपुरी अभिनेते रवी किशन यांची २१ वर्षांची मुलगी इशिता शुक्ला अग्निपथ योजनेंतर्गत संरक्षण दलात सामील होणार आहे.” तर आता त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यावर कमेंट करत नेटकरी तिच्यावर अभिनंदनांचा वर्षाव करत आहेत.
हेही वाचा : रवी किशन यांनी वर्षभरात गमावले दोन भाऊ, भावाच्या निधनाची बातमी देताना अश्रू अनावर
गेल्या वर्षी रवी किशन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये ते म्हणाले होते- “माझी मुलगी इशिता शुक्ला आज सकाळी म्हणाली, ‘बाबा, मलाही अग्निपथ योजनेप्रमाणे सैन्यात भरती व्हायचं आहे’. मी म्हणालो- जरूर जा बेटा.” तर आता इशिताचं स्वप्न साकार होत आहे. रवी शुक्ला यांची इशिता एक एनसीसी कॅडेट आहे. तिने २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट येथे होणाऱ्या संचलनातही भाग घेतला होता. त्याबद्दल तिचा गौरवही करण्यात आला होता. आता इशिता लवकरच सैन्यात भरती होणार असल्याने रवी किशन यांचे चाहतेही खूप आनंदी झाले आहेत.