दाक्षिणात्या चित्रपटांना हिंदी बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळतो हे आपण याआधीही अनुभवलं आहे. ‘पुष्षा’, ‘केजीएफ’ सारखे चित्रपट याचं उत्तम उदाहरण आहेत. आता आणखी एक दाक्षिणात्य चित्रपट चर्चेत आला आहे. अभिनेता ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ चित्रपट ३० सप्टेंबरला कन्नड व मल्याळममध्ये प्रदर्शित झाला. तर १४ ऑक्टोबरला हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला आहे. IMDb वर हा चित्रपट टॉपला आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने ‘केजीएफ चॅप्टर 2’, ‘आरआरआर’ चित्रपटांना मागे टाकलं आहे.
अॅक्शन थ्रीलर असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन व लेखन स्वतः ऋषभनेच केलं आहे. तर ‘केजीएफ’चे निर्माते मेकर्स होम्बाल फिल्म्स यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘कांतारा’ला IMDb वर १० पैकी ९.६ रेटिंग मिळाली आहे. कन्नड चित्रपटसृष्टीसाठी हा मोठा रेकॉर्ड आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे.
याआधी ‘केजीएफ २’ चित्रपटाला IMDb वर ८.४ रेटिंग मिळालं होतं. त्याचबरोबरीने एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाला ८.० रेटिंग मिळालं. ‘केजीएफ २’च्या यशानंतर ‘कांतारा’ कन्नडमधील सगळ्यात यशस्वी चित्रपट असल्याचं मानलं जात आहे. हा चित्रपट कन्नडमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर १३ दिवसांमध्येच चित्रपटाने ७२ कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिसवर गल्ला जमावला.
आणखी वाचा – Video : एकीकडे मेकअप अन् दुसरीकडे मुलाला स्तनपान करत होती सोनम कपूर, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
१६ कोटी रुपये बजेट असलेला हा चित्रपट फक्त कन्नड भाषेमध्येच प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता निर्मात्यांनी हिंदी, तमिळ, तेलुगू भाषेमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचं ठरवलं. कर्नाटकच्या समुद्रकिनारी असलेल्या परिसराभोवती ‘कांतारा’ची कथा आधारित आहे. आदिवासी लोकांना बऱ्याच वर्षापूर्वी या परिसरामधील राजा एक जागा भेट देतो. कारण या जागेवर आदिवासी लोकं घर तसेच मंदिर तयार करतील. पण त्यानंतर राजाच्या नातवाच्या नातवाला ती जागा परत हवी असते. त्यानंतर नेमकं काय घडतं? हे एका नव्या अंदाजामध्ये या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे.