गायत्री हसबनीस
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर स्वत:ला अभिनयाच्या क्षेत्रात पुन्हा गुंतवून घेणाऱ्या अभिनेत्री नीतू कपूर सध्या रिॲलिटी शो आणि चित्रपटांच्या माध्यमातून लोकांसमोर आल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत तर रणबीर-आलियाचे लग्न, ‘ब्रह्मास्त्र’ची घोषणा, त्याच्याच ‘शमशेरा’ या आगामी चित्रपटाची चर्चा आणि सासूच्या भूमिकेतून आलियाशी जुळलेले नाते अशा अनेक गोष्टींबद्दल प्रश्न विचारून नीतू यांना प्रसिद्धीमाध्यमांनी अक्षरश: भंडावून सोडले. या सगळय़ालाच कायम आनंदाने सामोरे जाणाऱ्या नीतू यांनी खूप दिवसांनी आलेल्या त्यांच्या ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाच्या निमित्ताने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या..
सध्या रिॲलिटी शो आणि चित्रपटातून नव्याने प्रेक्षकांना सामोरे जाणाऱ्या नीतू यांनी इतक्या वर्षांत त्यांच्यात आणि अभिनयाच्या क्षेत्रात पडलेलं अंतर जणू वेगाने पुसून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं कारण म्हणजे नुकताच ‘जुग जुग जिओ’ हा त्यांचा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्यानिमित्ताने चित्रपटाविषयी बोलत असताना लवकरच ओटीटीवरही आपण पदार्पण करणार असल्याचे जाहीर करून त्या मोकळय़ा झाल्या.
सध्या कलाकारांना विविध माध्यमांची दारे खुली झाली आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते नायिकांना वेगळे काही करण्याची ऊर्जाही मिळाली आहे आणि संधीही आहेत; पण म्हणून व्यावसायिकदृष्टय़ा चित्रपटांचा विचार करता स्त्री भूमिका वा आशय ठळकपणे मांडणारे चित्रपट सातत्याने येतील, हे मानणे चुकीचे ठरले, असे त्या म्हणतात. ‘गंगूबाई काठियावाडी’सारखा चित्रपट मुख्य प्रवाहात सातत्याने बनण्याची जोखीम कोणी घेणार नाही, तिथे मनोरंजक चित्रपटांचीच गरज जास्त असेल. त्यामुळे सध्या आशयात्मक प्रयोग करण्यासाठी ओटीटी माध्यमावर वाव आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि आपणही अशाच आशयघन चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
‘जुग जुग जिओ’ चित्रपटातील त्यांची आईची भूमिका ही खूप सुंदर पद्धतीने लिहिली आहे. त्यामुळेच ती उठावदार झाल्याचे सांगत त्याचे सगळे श्रेय त्या दिग्दर्शक राज मेहता यांना देतात. नीतू यांची कारकीर्द बालकलाकार म्हणून सुरू झाले होते. पुढे अभिनेत्री म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. सुपरस्टार ऋषी कपूर यांच्या पत्नी, रणबीर-रिधिमाची आई या जबाबदाऱ्या निभावताना त्यांनी चित्रपटांमधून एक मोठा काळ विश्रांती घेत घरासाठी संपूर्ण वेळ दिला. आता हळूहळू या जबाबदाऱ्यांमधून मोकळय़ा होत त्या नव्याने अभिनयाकडे वळल्या आहेत. वयाची साठी ओलांडली तरी आजही त्याच उत्साहाने वावरणाऱ्या नीतू आयुष्यात आपण सकारात्मकच राहायला हवे, सगळय़ांशी भेटताना व बोलताना चेहऱ्यावर स्मित ठेवायला हवे, असे सांगतात. तुमच्या आयुष्यात काही असो-नसो, पण नेहमीच आनंदी राहणं हे माझ्या हसतमुख आयुष्याचे गुपित आहे, असे सांगतानाच आपण फार शिस्तबद्ध आहोत. जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी नियमित व्यायाम, दररोज पंधरा ते वीस सूर्यनमस्कार घालणे, आहाराकडे लक्ष या सगळय़ाचे न चुकता पालन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लगीन घाई..
लग्नाविषयी कोणाला काहीच सांगायचे नाही, या सूचनेमुळे मी कोणाला काहीच सांगू शकत नव्हते. खरं तर मी स्वत: सप्टेंबरच्या महिन्यात लग्नाचा मुहूर्त शोधत होते, तसे प्रयत्नही मी सुरू केले होते; पण लग्नाला जास्त उशीर नको. पुन्हा करोना आला किंवा टाळेबंदी लागली तर काय, त्यामुळे कसलाच विलंब नको, यावर रणबीर आणि आलिया ठाम होते. मीही मग तयार झाले, त्यामुळे जेव्हा सगळं ठरलं तेव्हा माझ्या हातात लग्नाच्या तयारीसाठी फक्त दहाच दिवस होते. या दहा दिवसांत करायच्या अशा पुष्कळ गोष्टी होत्या, माझी अक्षरश: तारेवरची कसरत झाली. लग्नाविषयीच्या गुप्ततेमुळे बाहेर खरेदीसाठी जाणंही मुश्किलच होतं, तेव्हा मी घरात बसून सगळय़ा गोष्टी सांभाळल्या. आजूबाजूला करोनामुळे इतके विचित्र – अनिश्चित वातावरण, तणावाचा काळ असताना आपण खर्चीक लग्न समारंभ करायचे हे आम्हाला पटणारे नव्हते. म्हणून फार तामझाम न करता हा लग्नसोहळा पार पाडला, याचा आम्हाला आनंद आहे. खरं तर ऋषी यांना मोठा लग्न समारंभ नक्कीच आवडला असता. रणबीर नेहमीच म्हणायचा, की त्याला लवकरच लग्न करायचे आहे, पण अर्थात ती योग्य वेळ आणि योग्य जोडीदार सापडावा लागतो आणि आलियाच्या येण्याने त्याला त्या सगळय़ा गोष्टी मिळाल्या याचा खूप आनंद वाटतो, अशी भावना नीतू कपूर यांनी व्यक्त केली.
सून माझी लाडाची
मला आयुष्यात फार चांगली माणसं मिळाली. माझ्या सासूबाईही माझा आधारस्तंभ होत्या. माझ्यात आणि ऋषीमध्ये जरी काही भांडण झालेच तर त्या हक्काने माझी बाजू घ्यायच्या. भांडणातूनही परत एकजूट व्हावी म्हणून त्या कायम प्रयत्नशील असायच्या. त्यांचे आणि माझे नाते जसे होते तसेच ते आता माझे आणि माझ्या सुनेचे- आलियाचे आहे. ती अत्यंत गुणी मुलगी आहे. रणबीर हा नात्यांमध्ये समतोल राखणारा मुलगा आहे, त्यामुळे आलियात आणि माझ्यात दुरावा येणं शक्यच नाही, असा विश्वास त्यांनी आलियाबरोबरच्या आपल्या नात्याबद्दल बोलताना व्यक्त केला.
रेखा, रीना रॉय आणि मी.
आमच्या काळात ग्लॅमर असले तरी हिरॉईन म्हणून नायिकेने अशीच शरीरयष्टी ठेवावी असा काही आग्रह नसायचा. मी, रेखा किंवा रीना रॉय.. आमची शरीरयष्टी तर चारचौघींप्रमाणेच होती. अर्थात, झीनत अमान आल्यानंतर तो बदल झाला. पुढे त्या दृष्टीने नायकांसाठीही बारीक असणं, दिसणं महत्त्वाचं ठरू लागलं. झिरो फिगर ही संकल्पना तेव्हा नव्हती, अगदी दक्षिणेतही यावर जोर नाही. हिंदूीत मात्र त्यासाठी फार आग्रह धरला जातो आहे, असे त्यांनी सांगितले.
आत्मचरित्र येईल, पण..
मला आत्मचरित्र लिहिण्याविषयी अनेकांकडून आग्रह होतो. त्यासाठी फार वेळ द्यावा लागेल. माझ्या आयुष्यात लहानपणापासून चित्रपट करिअर, ऋषी यांच्याशी लग्न, कुटुंबाशी नाते, ऋषी यांचे आजारपण अशा अनेक गोष्टी आहेत; पण ते उतरवण्यासाठी कधी आणि कसा वेळ मिळेल, याबद्दल त्या साशंक असल्याचे सांगतात.