हिंदी – मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार असो वा दिग्दर्शक.. चित्रपट एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला की तो प्रेक्षकांची किती गर्दी खेचतो आणि किती कोटींचा गल्ला कमावतो याची टांगती तलवार प्रत्येकाच्याच डोक्यावर असते. याबाबतीत आघाडीचा कलाकार वगैरे असा भेदभावही फुकाचा ठरतो. मात्र जमा-खर्चाच्या या कात्रीतून मान सोडवत अधिक सर्जनशील स्वातंत्र्य घेऊन कलात्मक प्रयोग करण्याची संधी ओटीटी माध्यमामुळे सगळय़ांनाच मिळाली आहे. ‘काकुडा’ या चित्रपटाच्या माध्यमातून ‘ओटीटी’वर पदार्पण करणारा अभिनेता – दिग्दर्शक रितेश देशमुखही ‘ओटीटी’मुळे कलाकृतीच्या माध्यमातून प्रयोगात्मक स्वातंत्र्य अधिक आणि तिकीट खिडकीवरच्या कमाईचा ताण जरा कमी होत असल्याचं मान्य करतो.
गेल्या काही वर्षांत अभिनयानेच नव्हे तर दिग्दर्शन शैलीनेही चाहत्यांना ‘वेड’ लावणाऱ्या रितेश देशमुखचा ओटीटी पदार्पणाचा योगही खास ठरला आहे. रितेशची मुख्य भूमिका असलेला ‘काकुडा’ हा आदित्य सरपोतदार दिग्दर्शित चित्रपट थेट ओटीटीवर म्हणजे ‘झी ५’वर १२ जुलैला प्रदर्शित होणार आहे. आणि त्याच दिवशी जिओ सिनेमा या ओटीटी वाहिनीवर रितेशची पहिलीवहिली वेबमालिका ‘पिल’ प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ओटीटी माध्यमावरचं त्याचं पदार्पण दुहेरी आनंददायी ठरणार आहे.
‘ओटीटी असो वा चित्रपटगृहात प्रदर्शित होणारी कलाकृती असो, कथेशी प्रामाणिक राहात शंभर टक्के मेहनत करावीच लागते. त्यामुळे माध्यम कुठलंही असलं तरी कलाकार म्हणून सादरीकरणावर मी तेवढीच मेहनत घेतो. पण व्यावसायिक चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवण्यासाठी लागणारी जी समीकरणं सांभाळावी लागतात त्याचं दडपण ओटीटीवर काम करताना नसतं. त्यामुळे साहजिकच दिग्दर्शक आणि कलाकार दोघांनाही कथानक मांडणीच्या शैलीत प्रयोग करण्याचा धोकाही पत्करता येतो आणि वेगवेगळय़ा पद्धतीची कथानकं-व्यक्तिरेखांची मांडणी करण्याचं स्वातंत्र्यही ओटीटीवर अधिक मिळतं. जगभरातील प्रेक्षक त्यांच्या सोयीने आपली कलाकृती अनुभवू शकणार आहे ही आणखी एक जमेची बाजू ठरते’, असं रितेशने सांगितलं.
हेही वाचा >>>‘कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग’, धर्मवीरच्या ट्रेलरमधून राजकीय टोला
‘काकुडा’ हा रितेशचा पहिलाच विनोदी भयपट आहे. त्याने याआधी कित्येक विनोदी चित्रपट केले आहेत. विनोदाची उत्तम जाण, विनोदी अभिनयासाठी आवश्यक टायिमग, विनोदाच्या जागा काढणं यातलं त्याचं प्रभुत्व त्याने याआधी सिद्ध केलं आहे. मात्र विनोदी भयपटात काम करणं हा सर्वार्थाने वेगळा अनुभव असल्याचं रितेशने सांगितलं.
‘विनोदी चित्रपटात कलाकार संवादातून विनोदाची जागा काढू शकतो. त्याच्या हावभावातून, अभिनयातून त्याला ती व्यक्तिरेखा विनोदी वाटावी अशा पद्धतीने साकारता येते.