हॅरी पॉटर हे नाव माहीत नसलेली व्यक्ती शोधून सापडणंही अवघड आहे. केवळ भारत अमेरिकेतच नाही तर जगातील कित्येक मुलांचं बालपण अधिक अविस्मरणीय करण्यात याच हॅरी पॉटरचा खूप मोठा सहभाग आहे. आज अशाच असंख्य हॅरी पॉटर चाहत्यांसाठी अत्यंत दुखद बातमी समोर आली आहे. या चित्रपटाच्या सीरिजमधील अत्यंत लाडकं असं रुबियस हॅग्रिड हे पात्र साकारणारे रॉबी कॉलट्रेन यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी रुबियस यांचं निधन झालं

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हॅरी पॉटरमधील त्यांचं पात्र हे प्रेक्षकांना फारच भावलं होतं. त्यांचा तो अंदाज आणि विनोदी शैली लोकांनी चांगलीच डोक्यावर घेतली. नुकतंच त्यांच्या एजंटने स्कॉटलंडमधील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. हॅरी पॉटरमधील त्यांचं पात्र लोकप्रिय झालं असलं तरी त्यांनी इतरही बऱ्याच चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. जेम्स बॉन्डच्या २ बॉन्डपटात ‘गोल्डनआय’ आणि ‘द वर्ल्ड इज नॉट इनफ’ या दोन्ही चित्रपटातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत.

रॉबी यांची एजेंट बेलिंडा राइट यांनी ही बातमी देताना रॉबी यांच्याबरोबरच्या काही आठवणींना उजाळा दिला. हॅग्रिड या पात्राच्या माध्यमातून त्यांनी केवळ लहान मुलांच्या नव्हे तर मोठ्यांच्याही चेहऱ्यावर हसू आणलं असंही त्या म्हणाल्या. याबरोबरच या कठीण परिस्थितीमध्ये प्रेक्षकांनी रॉबी यांच्या कुटुंबीयांना त्यांचा खासगी वेळेत तसदी देऊ नये याची विनंतीही केली. रॉबी यांच्या जाण्याने हॉलिवूडच्या कलाकारांनी तसेच तिथल्या राजकीय नेत्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे.

२०११ मध्ये रॉबी यांना त्याच्या चित्रपटातील योगदानाबद्दल ‘बाफता स्कॉटलंड पुरस्कार’ देऊन सन्मानित केलं होतं. रॉबी यांनी १९७९ मध्ये आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांना बीबीसीच्या ‘A kick up the eighties’ या विनोदी सीरिजमुळे खरी ओळख मिळाली. याबरोबरच त्यांनी इतरही काही सिरियल्स आणि चित्रपटात बऱ्याच भूमिका केल्या. पण आजही हॅरी पॉटर हे पुस्तक न वाचलेला आणि चित्रपट न पाहिलेला प्रेक्षकही त्यांना ‘रुबियस हॅग्रिड’ म्हणूनच ओळखतो. रॉबी यांच्या चेहऱ्यावरील तो निरागसपणा आणि ते अत्यंत गोड रुबियस हॅग्रिड हे पात्र लोकांच्या कायम स्मरणात राहील. रॉबी कॉलट्रेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor robbie coltrane who played harry potter famous character hagrid dies aged 72 avn