‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम घराघरात आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते. संपूर्ण महाराष्ट्रातून ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या प्रत्येक पर्वाला चांगला प्रतिसाद मिळतो. ‘आता आलीये आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ’, असं या कार्यक्रमाच्या पर्वाचं ब्रीदवाक्य आहे. अभिनेते सचिन खेडेकर हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. नुकतंच सचिन खेडकरांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते मराठी भाषा आणि नोकरी याबद्दल भाष्य करताना दिसत आहेत.
आतापर्यंत अनेक कलाकारांनी मराठी भाषा सक्तीबद्दल विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. नुकतंच मराठी एकीकरण समितीने अभिनेते सचिन खेडेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ कोण होणार करोडपती या कार्यक्रमातील आहे. हा व्हिडीओ अवघ्या ४७ सेकंदाचा असून सध्या त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
‘कोण होणार करोडपती’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, तारीखही ठरली
या व्हिडीओत सचिन खेडेकर म्हणतात, “तुम्हाला कॉल सेंटरला फोन लावायचा असतो. इंग्रजी, हिंदी आणि मराठी असे तीन भाषांचे पर्याय असतात. तुम्ही मराठी निवडता. तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाता. तिथेही मराठी, हिंदी आणि इंग्रजी असे तीन भाषांचे पर्याय असतात. त्यावेळीही तुम्ही मराठी पर्याय निवडता. तुम्हाला मार्केटींगवाल्यांचा फोन येतो. तुम्हाला त्यांच्यासोबत हिंदी किंवा इंग्रजीतून बोलायला लागते.”
“त्यावेळी तुम्ही मराठी बोलायचा आग्रह धरा. खरंतर सहसा असे होत नाही. पण व्हायला पाहिजे. कारण हा मराठीचा अतिरेकी अभिमान नाही. हा हजारो लोकांच्या नोकरीचा प्रश्न आहे. मराठीचा आग्रह धरु या. कारण आपल्यामुळे मराठी माणसाला नोकरी मिळेल. व्यवसाय मिळेल. आपण एक पाऊल पुढे टाकूया. मग आपोआपच मराठी पाऊल पुढे पडेल!”, असे सचिन खेडेकर यांनी म्हटले.
दरम्यान सचिन खेडेकर यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्यांचा हा व्हिडीओ शेअर करत मराठी एकीकरण समितीने धन्यवाद सचिन खेडेकर साहेब सहकार्य केल्याबद्दल, अशी पोस्ट केली आहे. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. भारी.. हे आर्थिक समाजकारण समजणे व सार्वजनिकरीत्या यावर चर्चा करणे खुपपपपप गरजेचे आहे. महाराष्ट्रात राज्यभाषा #मराठीची मागणी म्हणजे मराठीचा अभिमान व कडवटपणा.. कट्टरपणा नाही. भाषेचा व्यवहारीक वापर व व्यावसायिक महत्व वाढले तरच भाषा टिकते व वाढते, अशी कमेंट एका नेटकऱ्याने या व्हिडीओखाली केली आहे.