महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त सध्या पंढरीनगरी गजबजली आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात मोठी यात्रा भरली आहे. तसेच या निमित्ताने राज्यभरातून विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येत आहेत. नुकतंच कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत ही पूजा केली. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याच्या वडिलांच्या सेवेबद्दल सांगितले आहे.
मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. त्याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. सध्या संकर्षण हा माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत यशच्या मित्राची भूमिका साकारत आहे. नुकतंच त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. याबरोबर त्याने त्याला एक कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “मी २१ वर्षांचा आणि ती १६…”, तब्बूबरोबर नात्याची चर्चा रंगत असताना नागार्जुनने केलेले जाहीर वक्तव्य
संकर्षण कऱ्हाडेची संपूर्ण पोस्ट
“आज कार्तिकी एकादशी..” विठ्ठल विठ्ठल..
आमचे बाबा गेले ८/१० दिवस पंढरपूरी गेलेत.. सेवेला.. आता सेवा म्हणजे काय..? तर , तिथे जाउन निस्वार्थीपणे नेमून दिलेले काम करणे.. पावत्या फाडणे .. भक्तांसाठी नियोजन करणे..गेली अन्नेक वर्षं , हजारो लोक हे करत आहेत.. पण मला आमच्या बाबांचं फार कौतुक वाटतं..
स्टेट बॅंक आॅफ हैद्राबाद मध्ये मोठ्ठं पद भूषवलेले , सगळं एैश्वर्य ऊभं केलेले , अनुभवलेले आमचे बाबा तिथे जाउन मस्तं भक्तं निवास मध्ये एका हाॅल मध्ये राहातात, सतरंजी टाकून झोपतात , चंद्रभागेवर स्नानाला जातात .. विठ्ठल , पांडूरंग आपल्याला हेच सांगतो …. ; “ आपलं ते सगळं विसरून समरस होणे म्हणजे वारी..” म्हणुनच ज्ञानेश्वर माऊलि म्हणतात ; “ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे.. तुटेल धरणे प्रपंचाचे ..”
एरवी सतत फोन करणारे आमचे बाबा गेल्या आठ दहा दिवसांत तिकडेच रमलेत.. आम्हालाच फोन करावा लागतो . . आणि फोनवर आता हॅलो नाही “रामकृष्ण हरि” म्हणतात .. हे सगळं करायला वेगळीच ऊर्जा लागते .. खरंच .. अशी सेवा करणाऱ्या त्या सगळ्यांनाच , हा निस्वार्थ भाव शिकवणाऱ्या त्या वारिला .. आणि ह्या सगळ्यांची वाट पाहात “युगं अठ्ठाविस” ऊभ्या असणाऱ्या त्या “पांडूरंगाला” दंडवत ….
पांडूरंग आवडायला फार भाग्यं लागतं खरंच .. म्हणुन माऊली म्हणतात; “बहुत सुकृतांची जोडी , म्हणुनी विठ्ठली आवडीं..”
रामकृष्ण हरि .. #बाबा”, असे संकर्षण कऱ्हाडेने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : “स्नेहलतामुळे अनेकांच्या पोटावर पाय आला…” किरण मानेंनी केले गंभीर आरोप
दरम्यान संकर्षण कऱ्हाडेच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहे. तसेच त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे. सध्या तो मालिका आणि नाटक यामध्ये व्यस्त आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत त्याने यशचा मित्र समीर ही भूमिका साकरली आहे. या मालिकेचं शूटिंग, नाटकाचे प्रयोग, परदेशातील नाटकाचे दौरे यातून वेळात वेळ काढून तो चाहत्यांसाठी विविध पोस्ट करताना दिसतो.