मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी कलाकार म्हणून ओळखले जाते. त्याच्या अभिनयाचे, लिखाणाचे, दिग्दर्शनाचे, कवितांचे आणि त्याच्या सूत्रसंचालनाचे लाखो चाहते आहेत. संकर्षणने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. सध्या संकर्षण हा ‘तू म्हणशील तसं’ आणि इतर काही व्यावसायिक नाटकांमुळे चांगलाच चर्चेत आहे.
नुकतंच संकर्षणने यूट्यूबवरील ‘व्हायफळ’ या यूट्यूब चॅनलवरील पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये संकर्षणने त्याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल भाष्य केलं. याबरोबरच त्याने त्याच्या लिखाणाबद्दलही भाष्य केलं, याबरोबरच त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही वेगवेगळे खुलासे केले. परभणी आणि औरंगाबाद म्हणजेच आजचं संभाजीनगरमधील त्याच्या बालपणीच्या आठवणीही त्याने शेअर केल्या.
याच मुलाखतीदरम्यान संकर्षणने त्याच्या बालपणीचे भरपुर किस्से सांगितले. लहानपणापासूनच संकर्षण प्रचंड खोडकर होता हेदेखील त्याने सांगितलं. याबरोबरच एकदा संकर्षणने ३०० रुपयांची चोरी केली होती अन् त्यावर त्याच्या आजोबांनी त्याला जे सांगितलं ते ऐकून तर नक्कीच तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा चोरीचा भन्नाट किस्सा संकर्षणने या पॉडकास्टमध्ये सांगितला आहे.
आणखी वाचा : ‘डंकी’ फेम अभिनेत्याचं ‘अॅनिमल’बद्दल मोठं विधान; म्हणाला, “लोकांमध्ये प्रचंड संताप, चीड…”
संकर्षण म्हणाला, “माझे वडील बँकेत होते अन् त्यांच्यासमोर ज्या व्यक्तीचे अकाऊंट असायचे त्याची पूर्ण कुंडली समोर दिसायची. मला एक दिवस माझ्या आजोबांनी एटीएममधून ५०० रुपये काढून आणायला सांगितले. मी एटीएममध्ये गेलो अन् पहिले ३०० रुपये काढले अन् त्याची पावती फाडून फेकून दिली, नंतर ५०० रुपये काढले अन् त्याची पावती जपून ठेवली अन् घरी येऊन आजोबांना ५०० रुपये आणि त्याची पावती अशा दोन्ही गोष्टी दिल्या. आजोबा तेव्हा त्यावर विश्वास ठेवायचे.”
पुढे संकर्षण म्हणाला, “बाबा जेव्हा बँकेतून घरी आले तेव्हा त्यांनी आजोबांना विचारलं की त्यांनी ८०० रुपये कशासाठी काढले? तेव्हा त्यांचा प्रश्न ऐकताच मला ३०० रुपयांचा घाम फुटला, मला काहीच सुचेनासं झालं. आजोबांनाही पटकन ध्यानात येईना, त्यामुळे त्यांनीदेखील बाबांच्या होकारात होकार मिळवला अन् ८०० रुपये त्यांना लागणार होते हे सांगितलं. बाबा जेव्हा आत गेले तेव्हा आजोबांनी एक शिवी हासडत मला बोलावलं अन् म्हणाले, आपण चोरी करताना आपला बाप बँकेत आहे याचं तरी भान ठेवा!” अशाप्रकारे असे वेगवेगळे किस्से संकर्षणने या मुलाखतीमध्ये सांगितले.