हिंदी, दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने घराघरांत पोहोचलेले अष्टपैलू अभिनेते म्हणून सयाजी शिंदे यांना ओळखले जाते. सयाजी शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी पेलताना दिसत आहे. एक उत्तम अभिनेते असण्यासोबतच ते पर्यावरणप्रेमीही आहेत. ते सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच सयाजी शिंदे यांनी मुंबईतील घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर पालिकेच्या नव्या उड्डाणपुलावर बगळ्यांची शिकार केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आणली आहे. नुकतंच त्यांनी याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सयाजी शिंदे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी शिकार करताना शिकारसुद्धा होऊ शकते, असे म्हटले आहे. त्यासोबत त्यांनी फेसबुक लाइव्हचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. यात त्यांनी सर्वसामान्यांसाठी नुकतंच खुल्या झालेल्या घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर असलेल्या पालिकेच्या नव्या उड्डाणपुलावर बगळ्यांची कशाप्रकारे शिकार केली जात असल्याचे दाखवले आहे. त्यांनी हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करत त्या मुलांना जाबही विचारला आहे. मात्र या मुलांनी बगळ्यांना घेऊन पळ काढला.
घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर नव्याने उड्डाणपूल सुरु झाला आहे. या उड्डाणपुलाजवळून बगळ्यांचे थवे एकदम जात असतात. याचा फायदा घेऊन बाजूच्या झोपडपट्टीतील मुले या पुलावर उभे राहून बेचकीच्या सहाय्याने बगळ्यांची शिकार करुन त्यांना खाली पाडतात. त्यानंतर त्यांना आपल्यासोबत घेऊन जातात.
नुकतंच सयाजी शिंदे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ काही मुलं बगळ्याची शिकार करताना दिसत आहे. यात त्यांनी त्या बगळ्याला का मारले? असा जाब मुलांना विचारला आहे. त्यावेळी ही मुलं औषधासाठी मारले असं सांगताना दिसत आहे. यावेळी ते वारंवार त्या बगळ्याला कशासाठी मारले हे विचारत आहेत. त्यावर ती मुलं फार उद्धठपणे उत्तर देताना दिसत आहेत. सयाजी शिंदे यांनी हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद करत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच याप्रकरणी पोलीस प्रशासनाने लक्ष घालून कारवाई करावी, असे आवाहनही केले आहे.
दरम्यान त्यांच्या या व्हिडीओनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केली आहे. ‘या मुलांना ताब्यात घेऊन समज देऊन त्यांच्यावर कारवाई करावी’, अशी मागणी अनेकजण करताना दिसत आहेत. ‘बोलून उपयोग नाही. भर रस्त्यात धुतला पाहिजे अशा हरामखोरांना’, असा संतापही काहींनी व्यक्त केला आहे.