अभिनेते शरद पोंक्षे प्रत्येक विषयांवर आपलं मत अगदी स्पष्टपणे मांडताना दिसतात. त्यांचं खासगी आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिलं आहे. २०१८च्या अखेरीस त्यांना कर्करोगाचं निदान झालं. या गंभीर आजारावर मात करत आज त्यांनी पुन्हा एकदा कलाक्षेत्रामध्ये कमबॅक केलं आहे. पण त्यापूर्वी त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. याबाबतच एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं आहे. शिवाय त्यांनी आपल्या नव्या व्यवसायाबद्दलही यावेळी माहिती दिली.
रसिक वाचक-ठाणे यांनी आयोजित केलेल्या ‘ग-गप्पांचा’ या कार्यक्रमामध्ये शरद पोंक्षे यांनी हजेरी लावली होती. यावेळी ते म्हणाले, “करोना काळामध्ये मनोरंजन क्षेत्राची खूप वाताहात झाली होती. त्यात २०१९ हे वर्ष माझ्यासाठी खूप खराब होतं. कर्करोगामुळे आधीच बँक बॅलन्स संपला होता. जरा कुठे काम सुरु झालं आणि सात महिन्यांमध्येच करोनाला सुरुवात झाली. घर चालवण्यासाठी हाती पैसे असावे म्हणून कायतरी केलं पाहिजे यासाठी विचार केला.”
“त्यानंतर आम्ही चार-पाच मित्र एकत्र आलो. चितळे बंधू यांना मी भेटलो. त्यानंतर मी चितळे एक्सप्रेस सुरु केलं. यामधूनच बोरिवली व डोंबिवलीला दोन दुकानं सुरु केली. चितळेंची शाखा आम्ही या दोन ठिकाणी सुरु केल्यानंतर माझे दोन सहकारी डोंबिवलीचं दुकान सांभाळू लागले. मी बोरिवलीच्या दुकानाचं काम पाहतो. मी आता मिठाई विकतो.”
आणखी वाचा – लालबाग-काळाचौकी अन् चाळीतलं घर; कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावचा खऱ्या आयुष्याबाबत खुलासा
पुढे ते म्हणाले, “चित्रीकरण जेव्हा नसतं तेव्हा मी दुकानामध्ये बसतो. हा अनुभव खूप भन्नाट आहे. दुकानामध्ये असताना बऱ्याच स्त्रिया आतमध्ये येतात. कारण मिठाईच्या दुकानात पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रिया फार उत्साहाने खरेदी करायला येतात. मला दुकानात पाहिल्यावर स्त्रियांची कुजबूज सुरु होते. हे शरद पोंक्षे आहेत का? मी ही सगळी चर्चा ऐकत असतो. नंतर घाबरत घाबरत मला बोलतात तुम्ही शरद पोंक्षे यांच्यासारखे दिसता. मग मीदेखील कधी मूडमध्ये असलो की त्यांना विचारतो कोण शरद पोंक्षे?” शरद पोंक्षे आता अभिनयाबरोबर आपला व्यवसायदेखील सांभाळत आहेत.