कॉलेज आठवणींचा कोलाज

सिद्धार्थ चांदेकर

माझं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. मी ‘सर परशुरामभाऊ महाविद्यालय’ म्हणजेच एस.पी. कॉलेजमध्ये शिकलो. मी इंग्रजी साहित्यात बी.ए. केलं. कॉलेजचा पहिला दिवस माझ्यासाठी फारच ‘टेन्शन’चा होता, कारण माझ्या शाळेतले माझं सर्व मित्रमंडळ हे अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळलं होतं आणि मी एकटाच वालाच्या सवडय़ासारखा बाहेर पडलो होतो आणि कला शाखेकडे वळालो होतो. मी एका नवीन विश्वात एकटय़ाने प्रवेश केलाय, असं मला सारखं वाटायचं, पण हळूहळू हे एकटेपण कमी झालं. पहिल्या दिवशी दोन-तीन नवीन मित्र झाले, मग आम्ही एकत्र फिरायला लागलो. हळूहळू महाविद्यालयात धम्माल करायला सुरुवात केली.

शाळेत आपल्याला दररोज ठरलेला युनिफॉर्म असतो. नवीन कपडे फक्त स्नेहसंमेलनाच्या दिवशी घालायचीच परवानगी असते. पण कॉलेजात असं नसतं. रोज हवे ते कपडे घालण्याची मुभा असते. त्यामुळे मी महाविद्यालयासाठी खास शॉपिंग केली होती. नवीन जीन्स, फॅशनेबल टी शर्ट्स घेतले होते. सुरुवातीला त्यातलं रोज नवीन घालून मी कॉलेजात जायचो.

‘कला’ क्षेत्रातच पुढे करिअर करायचं असं काही मी ठरवलं नव्हतं. माझं पक्कं  ठरलं होतं की बारावी पूर्ण झाली की, मुंबईला जाऊन हॉटेल मॅनेजमेंटच शिक्षण घ्यायचं कारण तेच माझं स्वप्न होतं. मी कॉलेजच्या आधी छंद म्हणून एक-दोन सिनेमांमध्ये काम केलं होतं. त्यामुळे मी कॉलेजमध्ये तसा बऱ्यापैकी प्रसिद्ध होतो.

एक दिवस मला कॉलेजात मृण्मयी देशपांडे भेटली आणि तिने मला विचारलं की, ‘तूच सिद्धार्थ चांदेकर आहेस का? मला कळलं कीतू याच कॉलेजात आहेस, मी एक आठवडा झाला तुला शोधतेय. अरे! तुझं एका चित्रपटासाठी नाव विचारलं गेलं आहे.’ कॉलेजातलं माझं हे सर्वात पहिलं काम जे मुन्नामुळे मला मिळालं. मग आम्ही पुढे एक हिंदी चित्रपट केलाय. ‘हमने जिना सिख लिया’ जो ‘शाळा’ या कादंबरीवर आधारित होता. त्यात आम्ही दोघांनी पहिल्यांदा मुख्य भूमिकेत काम केलं. मग त्यानंतर माझी अभिनयाची घोडदौड सुरू झाली. पुरुषोत्तम, फिरोदिया करंडक अशा आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा करायला आम्ही सुरुवात केली. ‘पोपटी चौकट’ ही माझी पहिली एकांकिका. जी मुंबईत ‘सवाई’ एकांकिका स्पर्धेत निवडली गेली. पुण्यातून मुंबईत सवाईसाठी निवडलेली सर्वात पहिली एकांकिका हीच ठरली. त्या वेळी माझं आणि मृण्मयीचं काम श्रीरंग गोडबोले यांनी बघितलं. तेव्हा त्यांनी मला आणि मृण्मयीला ‘अग्निहोत्र’ या मालिकेच्या ऑडिशनला एकत्र बोलावलं आणि ‘अग्निहोत्र’ या मालिकेत मुख्य भूमिकेसाठी निवड झाली. ही मालिका सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केली होती. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. कॅमेऱ्यासमोर उभं राहून कसा अभिनय केला पाहिजे, याचं तंत्रदेखील मला शिकायला मिळालं. योगायोग असा की त्यांच्यामुळे मला नऊ  वर्षांनी ‘जिवलगा’ नावाची मालिका करण्याची संधी मिळतेय कॉलेजातील घडलेल्या या घटनांमुळे माझ्या आयुष्याला खरोखर कलाटणी मिळाली.

माझं कॉलेजातील फ्रेंड सर्कल पूर्णपणे कला क्षेत्राशी निगडित असलेल्या विद्यार्थ्यांनी भरलेलं होतं. आम्ही कलाकार मंडळी खूप ‘कल्लाकारी’ करायचो. एकदा झालं असं, आमचा तालीम हॉल काही नतद्रष्ट मंडळींनी हिसकावून घेतला होता आणि नाटकाचा सगळा सेट  तालीम हॉलच्या बाहेर काढून ठेवला होता. तेव्हा आमची एक एकांकिका स्पर्धेसाठी तालीम चालली होती आणि स्पर्धा अगदी तोंडावर तीन दिवसांवर आली होती. यावर युक्ती म्हणून आम्ही पूर्ण सेट कॉलेजच्या मागच्या बाजूला लावला आणि तालीम सुरू केली. आमची तक्रार अनेक जणांनी प्राचार्याकडे केली. मग आम्हीसुद्धा त्यांच्याकडे जागेची मागणी करायला लागलो, पण आम्हाला स्पर्धेच्या सकाळीदेखील हॉल मिळाला नाही. स्पर्धेच्या दिवशी सकाळी आम्ही एकत्र जमलो. कॉलेजात नटराजाची पूजा केली आणि तिथूनच थेट स्पर्धेला गेलो. आश्चर्य वाटेल, पण त्या दिवशी आम्ही ती स्पर्धा जिंकलो. कॉलेजात ट्रॉफी घेऊन परतल्यावर सगळ्यांना आनंद झाला आणि आम्हाला आमचा तालीम हॉल परत दिला गेला या प्रसंगाने मी खऱ्या आयुष्यात ‘धाकड’ झालो.

आमच्या कॉलेजला एस. एस. कॅण्टीन आहे. तिकडे समोसा पाव खूप अप्रतिम मिळतो. आजही कॉलेजला गेलो की मी तो आवर्जून खातो. रिसेसमध्ये आम्ही सगळे मित्र एकत्र कॅण्टीनला जायचो आणि सामोसा पाव खायचो. समोश्याचा एक घास ३२ वेळा काय ६४ वेळा आम्ही चावून चावून खायचो. ज्यात पुढचे एक-दोन लेक्चरला हमखास दांडी व्हायची. दुपारी साडेचार-पाच वाजता नागनाथ भुवन नावाच्या अमृततुल्य चहाच्या टपरीवर आम्ही फक्कड असा चहा घ्यायचो सोबत चहाची लज्जत वाढवायला क्रीम रोल असायचाच.

असे हे कॉलेजचे मंतरलेले दिवस. घाबरत घाबरत अकरावीला प्रवेश करणारा मी कॉलेजच्या शेवटच्या दिवशी मात्र स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभा राहिलो. कॉलेजचा शेवटचा असा दिवस मला पाहायला काही मिळाला नाही, कारण त्यादरम्यान माझी बरीच कामं सुरू होती. मालिका संपली होती आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं.

शब्दांकन : मितेश जोशी