दूरचित्रवाहिनीवर एखादा शो केवळ आपल्या सूत्रसंचालनाच्या जोरावर प्रसिद्ध करणं ही सोपी गोष्ट नाही. पण कायम सळसळत्या उत्साहाने वावरणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या पहिल्याच कार्यक्रमात सूत्रसंचालनाने बहार उडवून दिली. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये आणि कलाकारांमध्येही पसंतीचा ठरला आहे. कलाकारांचे साधे साधे खेळ घेत त्यातली धम्माल प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थने केले होते. आता या कार्यक्रमाचे दुसरे पर्वही प्रेक्षकांसमोर आले आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पहिल्याच भागात ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील मालिकांमधील कलाकारांनी सहभाग घेतला. आता पुन्हा त्याच उत्साहात हा कार्यक्रम सुरू झाला आहे. या दुसऱ्या पर्वाच्या निमित्ताने बोलताना सिद्धार्थने पहिल्या भागाच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या अभिनयाने एकांकिका-नाटक आणि आता मराठी-हिंदी चित्रपट गाजवणाऱ्या सिद्धार्थने सूत्रसंचालन केलं नव्हतं. ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या निमित्ताने मी पहिल्यांदा सूत्रसंचालन केलं, असं सिद्धार्थने सांगितलं. ‘हा कार्यक्रम सुरू करताना मनात थोडी भीती होती, पण कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला आणि घराघरात लोकप्रिय झाला. याचं संपूर्ण श्रेय ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आहे, असं त्याने सांगितलं. या कार्यक्रमाचं स्वरूपही लोकांना आवडेल वा मजा येईल असं असल्याचं तो सांगतो. ‘आता होऊ दे धिंगाणा’मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचा खेळ पाहताना प्रेक्षकही त्यात रंगत जातात. खेळ जिंकण्यासाठी त्यांची धडपड आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गमतीजमती सेटवर जशा आम्ही अनुभवत असतो तसंच प्रेक्षकही त्याचा आनंद घेऊ शकतात. त्यामुळेच हा कार्यक्रम रसिकांना अधिक आवडला, असं सिद्धार्थने सांगितलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा