तामिळ अभिनेता सिद्धार्थचा ‘चिठ्ठा’ नावाचा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. हा चित्रपट डब करून कर्नाटकमध्येही प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने सिद्धार्थ बंगळुरूमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता. पण काही कन्नड समर्थक आंदोलक घोषणाबाजी करत कार्यक्रमस्थळी पोहोचले व त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर सिद्धार्थला पत्रकार परिषद अर्ध्यात सोडावी लागली.
कावेरी नदीच्या पाण्यावरून कर्नाटक व तामिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये वातावरण तापलं आहे. याच दरम्यान हा प्रमोशन कार्यक्रम आयोजित करणं बरोबर नसल्याचं कर्नाटकमधील आंदोलक म्हणाले आणि अभिनेत्याला तिथून जाण्यास सांगितलं. आंदोलकांनी तिथे बराच वेळ गोंधळ घातला. त्यानंतर सिद्धार्थ मंचावर काही मिनिटं बसला होता. पण परिस्थिती बिघडल्याने तो पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून चित्रपटगृहातून बाहेर पडला.
सिद्धार्थने अद्याप बंगळुरूमध्ये घडलेल्या या प्रकारावर कोणतेही भाष्य केलेले नाही. तो सोशल मीडियावर त्याच्या चित्रपटाचे रिव्ह्यू शेअर करत आहे. पण चाहते मात्र या प्रकारामुळे नाराज झाल्याचं दिसत आहे. “दोन्ही राज्यात काही समस्या असू शकतात, पण अशा राजकीय मुद्द्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यत्यय आणणे आणि त्याला पत्रकार परिषद सोडण्यास भाग पाडणे खूप वाईट आहे,” असं एका चाहत्याने लिहिलं.
नेमका वाद काय?
कावेरी नदीचा पाणीवाटप प्रश्न जवळपास १३० वर्षं जुना आहे. कावेरी नदीचं पाणी आपल्या राज्यांमध्येही सोडलं जावं, यासाठी तामिळनाडू, केरळ व पुदुच्चेरीकडून मागणी केली जात आहे. कर्नाटकला पुरेल एवढं पाणी कावेरीत नसताना ते इतर राज्यांना कसं द्यावं? असा मुद्दा कर्नाटककडून उपस्थित केला जात आहे. पाणीवाटपावर आतापर्यंत अनेकदा तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले पण त्यात यश आले नाही. सध्या दोन्ही राज्यातील वातावरण तापलं असून तिथले शेतकरी आंदोलन करत आहेत.