अभिनेता-गायक आणि बिग बॉस कन्नड सीझन ५ चा विजेता चंदन शेट्टीचं लग्न मोडलं आहे. चंदन व याच शोची स्पर्धक निवेदिता गौडा लग्नाच्या चार वर्षानंतर वेगळे झाले आहेत. शुक्रवारी या जोडप्याने बंगळुरूमधील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. निवेदिता गौडाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर यासंबंधी एक पोस्ट शेअर केली आहे.
निवेदिताने लिहिलं होतं, “चंदन शेट्टी आणि मी आमचं नातं कायदेशीररित्या परस्पर संमतीने संपवलं आहे. आमच्या निर्णयाचा आणि मीडिया, आमचे मित्र आणि नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या चाहत्यांना या काळात आमच्या प्रायव्हसीचा आदर करण्याची आम्ही विनंती करतो. आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात आता वेगळ्या मार्गाने जात असलो तरीही आम्ही एकमेकांचा आदर करतो. या काळात तुमची तुम्ही समजून घेणं आम्हा दोघांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्हा सर्वांचे आभार.”
घटस्फोटाच्या घोषणेच्या फक्त एक आठवडा आधी हे दोघेही एका चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमात एकत्र गेले होते. अशातच अचानक या जोडप्याच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. ‘बिग बॉस कन्नड ५’ मध्ये जमलेली ही जोडी आता विभक्त झाली आहे. चार वर्षांच्या संसारानंतर चंदन व निवेदिता यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.
कंगना रणौत यांच्या कानशिलात मारल्याप्रकरणी एक्स बॉयफ्रेंड म्हणाला, “मला वाटतं की त्या महिलेच्या…”
३४ वर्षीय चंदन शेट्टी आणि निवेदिता गौडा दोघांची लव्ह स्टोरी खूप फिल्मी होती. ते दोघे रिॲलिटी शो बिग बॉस कन्नड सीझन ५ मध्ये भेटले होते आणि शोमध्येच ते प्रेमात पडले. रिॲलिटी शोमध्ये असताना चंदनने त्याच्या लेडी लव्हसाठी एक गाणं लिहिलं होतं, हे गाणं चाहत्यांनाही खूप आवडलं होतं. यानंतर २०१९ मध्ये म्हैसूरमध्ये दसरा उत्सवादरम्यान, एका कार्यक्रमादरम्यान चंदन शेट्टीने निवेदिता गौडाला लग्नाची मागणी घातली होती, २०२० मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. पण आता चार वर्षांनी या जोडप्याने विभक्त व्हायचा निर्णय घेतला आहे.
चंदन शेट्टी हा संगीतकार, गीतकार आणि गायक आहे, तो प्रामुख्याने कन्नड चित्रपटसृष्टीत काम करतो. २०१६ मध्ये आलेल्या रेल्वे चिल्ड्रन चित्रपटातून त्याने संगीतकार म्हणून पदार्पण केलं. निवेदिता गौडा ही एक एन्फ्लुएन्सर आहे जी बिग बॉस कन्नडमध्ये स्पर्धक म्हणून आली होती. या शोमध्ये झळकल्यावर तिला प्रसिद्धी मिळाली.