पुणे : रंगभूमीवर लोकप्रिय झालेले डॉ. काशिनाथ घाणेकर हे एकमेवाद्वितीय कलाकार होते. सहजपणे हाताला न लागणारे घाणेकर यांचे व्यक्तिमत्त्व पाऱ्यासारखे निसटून जाणारे. त्यामुळे अभिनय करताना मी त्यांची नक्कल तर करणार नाही ना, असा प्रश्न मला पडला. मी त्यांच्यातील माणूस शोधण्याचा प्रयत्न केला. डॉ. घाणेकर यांची झेरॉक्स होऊ शकत नाही. मी केवळ त्यांचा आभास निर्माण केला आहे, अशी भावना ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटात घाणेकर यांची भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावे याने व्यक्त केली. ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट ८ नोव्हेंबरपासून प्रदर्शित होत असून त्यानिमित्ताने सुबोध भावे, सुमीत राघवन यांच्यासह चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी संवाद साधला. डॉ. काशिनाथ घाणेकर यांना मी कधी पाहिले नाही. त्यांचे चित्रपटदेखील पाहिले नाहीत. चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी आणि कांचन घाणेकर यांचे आशीर्वाद घेतले असले त्यांच्याशी डॉ. घाणेकर यांच्या व्यक्तिमत्त्वासंदर्भात कोणतेही बोलणे झाले नाही, असे सुबोधने सांगितले. यापूर्वी बालगंधर्व आणि लोकमान्य या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, माझ्या स्वभावाविरुद्ध असलेली डॉ. घाणेकर यांची भूमिका साकारणे माझ्यासाठी अवघड होते, असेही त्याने सांगितले.