गेल्या काही वर्षांत चित्रपट – मालिका आणि रंगभूमीवर कलाविष्काराचा ठसा उमटविणारे मराठीतील आघाडीचे कलाकार हिंदीतही वेगवेगळ्या वेबमालिका आणि चित्रपटांमधून आव्हानात्मक व्यक्तिरेखा रंगवताना दिसत आहेत. अभिनेता चिन्मय मांडलेकर, अमेय वाघ, गश्मीर महाजनी, वैभव तत्ववादी अशा मराठी कलाकारांच्या पंक्तीत आणखी एका अभिनेत्याचं नाव दाखल झाले आहे. अभिनयाबरोबरच निर्मितीच्या क्षेत्रातही रमलेला अभिनेता सुबोध भावे लवकरच बिरबलाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
हेही वाचा >>> “मेरे बस में नहीं अब…” पाठकबाईंची राणादासाठी रोमँटीक पोस्ट, कमेंट करत हार्दिक जोशी म्हणाला…
मुघल साम्राज्यातील अंतर्गत हेवेदावे, सत्ता आणि वारसाहक्कांसाठी झालेले संघर्ष यांची कथा रंगवणारी ‘ताज : डिव्हायडेड बाय ब्लड’ ही वेबमालिका लवकरच ‘झी ५’वर प्रदर्शित होणार आहे. या वेबमालिकेची घोषणा नुकतीच एका रंगतदार सोहळ्यात करण्यात आली. यानिमित्ताने, या वेबमालिकेत आपण बिरबलाची भूमिका केली असल्याची वर्दी खुद्द सुबोधने आपल्या चाहत्यांना समाजमाध्यमांवरून दिली आहे. ‘लहानपणापासूनच ज्याच्या गोष्टी ऐकल्या, ज्याच्या हुशारीवर प्रेम केले, त्या ‘बिरबला’ची व्यक्तिरेखा या आगामी वेबमालिकेत साकारताना अत्यंत आनंद होत आहे. लवकरच काही दिवसांत ही वेबमालिका तुम्हाला ‘झी ५’वर पाहता येईल’, असे सुबोधने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. अर्थात ही वेबमालिका ‘झी ५’वर कधी प्रदर्शित होणार, याबाबतची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. हिंदीतील नामवंत कलाकार या वेबमालिकेत झळकणार आहेत.
‘ताज : डिवायडेड बाय ब्लड’ या वेबमालिकेत सम्राट अकबराचा कार्यकाळ विस्तृत रुपात दाखवण्यात येणार आहे. मुघलांच्या गादीसाठी योग्य वारसदार शोधण्यासाठी अकबराने केलेले प्रयत्न, त्याच्यानंतर मुघल सत्तेवर आलेल्या पिढया आणि त्यांचे अध:पतन यांच्या कथा या मालिकेतून पाहायला मिळणार आहेत. कौंटिल्य फिल्म्सची निर्मिती असलेल्या या वेबमालिकेत प्रसिध्द अभिनेते नसीरुद्दीन शाह अकबराच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनारकलीची भूमिका अदिती राव हैदरी साकारणार असून सलीमच्या भूमिकेत अभिनेता आशीम गुलाटी दिसणार आहे. याशिवाय, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हेही वेबमालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत असून बऱ्याच काळानंतर त्यांच्या अभिनयाची पर्वणी रसिकांना मिळणार आहे.