स्त्री हा निसर्गाचा मास्टरपीस आहे.. बायकांना जग चालवायला दिले तर युद्ध होणार नाही, फक्त एकमेकांशी न बोलणारे देश असतील, अशा अनेक टिप्पण्या बायकांबद्दल केल्या जातात. नेमक्या याच स्वभाववैशिष्टय़ांवर आधारित ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. प्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी या चित्रपटाद्वारे निर्माता म्हणून पदार्पण करणार असून मधुगंधा कुलकर्णी यांच्याबरोबर चित्रपटाचे पटकथा लेखन करणारे परेश मोकाशी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
‘नाच गं घुमा’ ही ज्येष्ठ लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेली कथा असून महिलांच्या अवतीभवती घडणाऱ्या आणि त्यांच्याशी संबंधित अनेक छोटय़ा-मोठय़ा गोष्टी यात गुंफल्या गेल्या आहेत. या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून त्या निमित्ताने एक छोटेखानी टीझर प्रदर्शित केला गेला. या चित्रपटाची निर्मिती परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी करणार होते, पण त्यांनी या चित्रपटाची कथा स्वप्निल आणि अभिनेत्री-निर्माती शर्मिष्ठा राऊत यांना ऐकवल्यानंतर त्यांनीही चित्रपटाची सहनिर्मितीची जबाबदारी घेण्याचे निश्चित केले.
अभिनेता स्वप्निल जोशी यांनी फेसबुकवर लिहिले आहे, ‘‘घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर जगातील सर्व सर्व स्त्रियांना त्रिवार वंदन करून घेऊन येत आहोत..आमच्या नव्या चित्रपटाची घोषणा..‘नाच गं घुमा. भेटू या चित्रपटगृहात १ मे २०२४ ला !’’