२०२० हे वर्ष सिनेसृष्टीसाठी खूपच दुदैवी ठरत आहे. या वर्षात करोनाच्या प्रकोपामुळे फिल्मी उद्योग ठप्प तर झालाच, पण त्याशिवाय ऋषी कपूर, इरफान खान, सुशांत सिंह राजपुत यांसारख्या काही प्रतिभाषाली कलाकारांनी जगाला अलविदा केला. आता आणखी एक दु:खद बातमी चाहत्यांसाठी आहे. अभिनेता तेजस डी. पर्वतकर यांचं निधन झालं आहे. अभिनेता सत्यजीत दुबे यांनी इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ही दु:खद बातमी दिली. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप कळलेले नाही.
“एक उत्तम कलाकार आणि मित्र तेजस डी पार्वतकर आज आपल्याला सोडून गेले आहेत. ते एक हुशार व्यक्ती होते. ते कायम साहित्य आणि रंगभूमीबाबत चर्चा करायचे. मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे ते फॅन होते. मुंबई डायरीजच्या सेटवर त्यांची भेट झाली होती. तुमच्या आठवणी कायम हृदयात राहतील. ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो.” अशा आशयाची इन्स्टा पोस्ट लिहून त्यांनी पर्वतकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
तेजस डी. पर्वतकर ‘मुंबई डायरीज २६/११’ या वेब सीरिजमध्ये झळकले होते. या सीरिज २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित आहे. याशिवाय ते ‘मुंबईचा राजा’, ‘हवा आन दे’ आणि ‘सनराइज’ या चित्रपटांमध्येही झळकले होते.