दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, रंगभूमी, चित्रपट, जाहिरातींना आवाज आदी विविध क्षेत्रांत दिवंगत विनय आपटे यांनी आपल्या अभिनयाचा आणि आवाजाचा ठसा उमटविला होता. त्यांच्या जन्मदिनी आयोजित करण्यात आलेल्या ‘विनय एक वादळ’ या कार्यक्रमात सहभागी कलावंतांनी त्यांच्या विषयीच्या आठवणींना उजळा देत आणि नाटकातील काही प्रवेश सादर करून आठवणींचा पट उलगडला.
प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकेत काम करणारे आजचे आघाडीचे अनेक कलावंत सहभागी झाले होते. विनय आपटे एक कलाकार, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून श्रेष्ठ होतेच पण त्यांच्यातील हळवेपण आणि एक माणूस म्हणून त्यांचे असलेले मोठेपण सांगत कलाकारांनी या ‘जगन्मित्रा’च्या स्मृतीला उजळा दिला. या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन मंगेश कदम यांचे होते. या प्रसंगी सुनील बर्वे (अफलातून), आदिती सारंगधर व चिन्मय मांडलेकर (एक लफडं विसरता न येणारं), शरद पोंक्षे (मी नथुराम गोडसे बोलतोय), मुक्ता बर्वे (कबड्डी कबड्डी) यांनी नाटकातील काही प्रसंग सादर केले. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, दिग्दर्शक मंदार देवस्थळी, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक मधुर भांडारकर, प्रकाश झा, गायक रवींद्र साठे, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ आणि अन्य सहकलाकारांनी विनय आपटे यांच्याविषयी आठवणींना उजळा दिला. तर सचिन खेडेकर, प्र. ल. मयेकर, दिलीप प्रभावळकर आिदचे मनोगत ध्वनिचित्रफितीद्वारे दाखविण्यात आले.
विनय आपटे प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ
विनय आपटे यांच्या पत्नी वैजयंती आपटे यांनी या वेळी विनय आपटे प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असल्याचे घोषित केले. नवोदित कलाकारांना मार्गदर्शन, त्यांच्यासाठी कार्यशाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रंगभूमीविषयक मार्गदर्शन, रंगभूमीवरील पडद्यामागील कलाकारांसाठी सहाय्य आदी उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा