एखाद्या यशस्वी चित्रपटाचा सीक्वेल पाहण्यासाठी प्रेक्षक कायम उत्सुक असतात. तशी उत्सुकता सध्या सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा’ या वीस वर्षांपूर्वी गाजलेल्या चित्रपटाच्या सीक्वेलपटाच्या निमित्ताने पुन्हा पाहायला मिळते आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’ हा सीक्वेलपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. यावेळी महाराष्ट्राबाहेर हैदराबाद, बंगळूरु, बेळगाव इथेही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’च्या मदतीने यूएस, कॅनडामध्ये त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमध्येही चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नेहमीसारखा मराठी चित्रपटाचा एखाददुसरा खेळ नाही तर संपूर्ण चित्रपट योग्य पद्धतीने वितरित करून एकाच वेळी जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक आणि प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी दिली. सचिन पिळगावकर यांच्यासह चित्रपटातील प्रमुख कलाकार अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि नव्या पिढीतले अभिनेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री हेमल इंगळे यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देत चित्रपटाविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

प्रवासाची गोष्ट लोकांना अधिक भावली…

‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात कथेतील पात्रांचा कोकण रेल्वेने होणारा प्रवास आणि त्या दरम्यान घडणारी रंजक गोष्ट पाहायला मिळणार आहे. याआधीच्या चित्रपटात बसमधून घडलेली सफर प्रेक्षकांनी अनुभवली होती. सीक्वेलमध्ये रेल्वेच्या प्रवासावर भर देण्यामागचं कारण स्पष्ट करताना, चित्रपटाच्या कथानकात सार्वजनिक वाहतूक असणं म्हणजेच त्यांनी लोकांबरोबर प्रवास करणं गरजेचं होतं. दुसरं म्हणजे अचानक आपल्याला कुठे लांब प्रवासाला जायचं असेल आणि बसची तिकिटं मिळाली नाहीत, मग रेल्वेची तत्काळमध्ये तिकिटं मिळाली, पण मग एक सीट या डब्यात तर दुसरी भलत्याच असा गोंधळ होतो. या छोट्या-छोट्या गमतीजमती यानिमित्ताने दाखवता आल्या. त्यामुळे कथानकात प्रवासासाठी वाहन कोणतंही असलं तरी त्यांचा प्रवास ही गोष्ट कायम आहे, असं सचिन पिळगावकर यांनी सांगितलं. ‘आपलं आयुष्य हाही एक प्रवासच असतो. आपले जिवलग, सहकारी सगळे एकमेकांचे सहप्रवासी आहोत. प्रवास नेहमी लोकांना आपलासा वाटतो, त्यामुळेच कदाचित ‘नवरा माझा नवसाचा’ हा पहिला चित्रपट प्रेक्षकांना भावला असावा’, असंही त्यांनी सांगितलं.

Shubhagi Gokhale reaction on sakhi and suvrat joshi drama varvarche vadhuvar
“सखीकडे बघून सारखं भरून येत होतं”, लेक आणि जावयाच्या नव्या नाटकावर शुभांगी गोखलेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “दोघांबद्दल आदर वाढला…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
joe jonas sophie turner divorce priyanka chopra
प्रियांका चोप्राचा दीर आणि जाऊबाई कायदेशीररित्या विभक्त, मुलींचा ताबा कुणाकडे? जाणून घ्या…
Eid-e-Milad 2024 holiday
Eid-e-Milad holiday: मुंबईत १६ सप्टेंबरची ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द; महाराष्ट्र सरकारकडून नवी तारीख जाहीर, जाणून घ्या कारण
Mukkam post Bombilwadi marathi drama
‘मु. पो. बोंबिलवाडी’ रुपेरी पडद्यावर, २४ वर्षांनंतर गाजलेल्या नाटकाचे माध्यमांतर

हेही वाचा: Video: “तुम्ही हा आठवडा गाजवला…”, रितेश देशमुखने पंढरीनाथ कांबळेच्या खेळाचं केलं कौतुक, म्हणाला, “अंगाला तेल लावून…”

अभिनेत्री म्हणून माझा प्रवास सुखकर…

अभिनेत्री म्हणून मी सचिन पिळगावकर यांच्याबरोबरच अधिक चित्रपट केले. त्या अर्थाने मी मला सुखकर वाटेल अशा पद्धतीनेच काम केलेलं आहे. सचिन यांची पत्नी म्हणून कायम प्रेक्षकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं आणि मला त्या ऋणानुबंधात राहायला आवडतं, अशी भावना अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी व्यक्त केली. या चित्रपटात त्या पुन्हा एकदा गणरायाला नवस बोलणाऱ्या भक्तीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

नटासाठी शोधकवृत्ती महत्त्वाची…

सचिन यांच्याबरोबरची मैत्री आणि यशस्वी कारकीर्दीविषयी बोलताना, ‘१४ चित्रपट आम्ही एकत्र केले आणि ते सगळे यशस्वी ठरले. या प्रत्येक चित्रपटात नवीन काय करता येईल हे आम्ही शोधत गेलो आणि हेच त्या चित्रपटांच्या यशाचं खरं कारण म्हणता येईल’, असं अशोक सराफ यांनी सांगितलं. ‘नटाची शोधक वृत्ती आणि दोन कलाकारांमध्ये असलेला बंध महत्त्वाचा ठरतो. आम्ही दोघंही एकमेकांना समजून घेत पुढे गेलो. वैयक्तिकरीत्या आमची बलस्थानं, कमकुवतपणा याची दोघांनाही चांगली समज आहे. एखादी नकारात्मक गोष्ट दुसऱ्याकडून सांगितली गेली तरी त्यामागचा हेतू ते काम चांगलं व्हावं हाच आहे हा विश्वास आमच्यात होता. त्यामुळे दोघांची मनं इतकी जुळलेली आहेत की काही न बोलता केवळ नजरेतून समोरच्याला काय सांगायचं आहे हे लक्षात येतं. या समजूतदार नात्यामुळेच आमचा आजवरचा कलाप्रवास खूप सुंदर झाला’, अशी भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

‘अशी ही बनवाबनवी’सारखे चित्रपट मराठी माणसाच्या रक्तात आहेत…

‘अशी ही बनवाबनवी’, ‘नवरा माझा नवसाचा’ यांसारखे चित्रपट या केवळ कलाकृती राहिलेल्या नाहीत. त्या मराठी माणसाच्या रक्तात भिनलेल्या आहेत. काही चित्रपट हे यश-अपयश, चांगलं-वाईट याच्या पलीकडे जाऊन लोकांचं प्रेम मिळवतात. ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट त्यापैकी एक आहे, असं मत अभिनेता स्वप्निल जोशी याने व्यक्त केलं. या चित्रपटातील भूमिका म्हणजे आपली मोठी कमाई असल्याचं सांगत महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्याबरोबर आपण एका दृश्यचौकटीत दिसणं, सुप्रिया पिळगावकर यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्रीबरोबर दृश्य देणं वा सचिन पिळगावकर यांच्यासारख्या प्रदीर्घ अनुभवी, नावाजलेल्या दिग्दर्शकाने आपल्यासाठी अॅक्शन आणि कट म्हणणं याची किंमत काय हे फक्त मराठी कलाकारच तुम्हाला सांगू शकतात. त्यामुळे अशा कलाकृतीचा भाग होता येणं यासारखं भाग्य नाही, अशा शब्दांत हा चित्रपट आपल्यासाठी काय आहे याची जाणीव स्वप्निलने करून दिली.

हेही वाचा: निक्कीला मारणं पडलं महागात, रितेशने सुनावलं अन् आर्याला बिग बॉसने दाखवला बाहेरचा रस्ता; म्हणाले, “अशा निंदनीय कृत्यांना…”

हा खऱ्या अर्थाने सीक्वेल आहे…

या चित्रपटात वॅकी आणि भक्तीच्या मुलीची भूमिका अभिनेत्री हेमल इंगळे हिने केली आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ हा प्रेक्षक म्हणून पाहिलेला पहिला मराठी चित्रपट होता. आठ वर्षांची असताना दूरचित्रवाहिनीवर हा चित्रपट पाहिला होता. त्यामुळे इतक्या वर्षांनी याच चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये काम करणं ही आपल्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट होती, असं हेमलने सांगितलं. त्याचबरोबर एका प्रेक्षकाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा चित्रपट खऱ्या अर्थाने ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा सीक्वेलपट असल्याचं तिने विश्वासानं सांगितलं.

चाहते तुम्हाला शहाणं करतात…

या चित्रपटाच्या निमित्ताने चाहत्यांच्या प्रेमाचे आलेले अनुभव कलाकारांनी सांगितले. मात्र प्रेक्षक किती चाणाक्ष असतात आणि ते कलाकाराला कसं शहाणं करतात याचा आपल्याला आलेला अनुभव अशोक सराफ यांनी सांगितला. ‘पांडू हवालदार’सारखे चित्रपट हिट झाल्यानंतर निर्माते बाळासाहेब सरपोतदारांनी मला त्यांच्या चित्रपटामध्ये एक गाणं करण्याची गळ घातली. मैत्रीपूर्ण संबंध असल्याने मी ते गाणं केलं. पुढे नागपूरमध्ये त्याच्या प्रीमिअरसाठी गेलो. शो संपून बाहेर पडत होतो, तिथे समोरच कट्ट्यावर काही तरुण बसले होते. आपापसांत बोलताना अरे हा चित्रपट पाहायला जाऊ नकोस रे… यात अशोक सराफ फक्त गाण्यापुरते आहेत, असा संवाद कानी पडला. तेव्हापासून यापुढे कधीही पाहुण्या कलाकाराची भूमिका करणार नाही, असा कानाला खडा लावला, असं सांगत कलाकारांनी चाहत्यांच्या अपेक्षांचा भंग कधीच करू नये हा शहाणपणाचा धडा मिळाल्याचंही अशोक सराफ यांनी सांगितलं.

तेव्हाचा प्रेक्षक सहज चित्रपटगृहापर्यंत येत होता…

‘आम्हाला त्याकाळी वर्तमानपत्रात चित्रपटाची जाहिरात दिली तरी पुरेसं असायचं. लोक वर्तमानपत्रात जाहिरात पाहून सचिनचा चित्रपट आहे, अशोक सराफ यांची त्यात भूमिका आहे हे पाहून कुटुंबाला घेऊन चित्रपट पाहण्यासाठी यायचे. त्यांच्यासाठी हा एक आनंदसोहळा असायचा. आता आम्हाला मराठी चित्रपटांसाठी प्रेक्षकांना खेचून आणावं लागतं’, असा अनुभव सचिन यांनी सांगितला. तर त्यावेळी चित्रपट रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सवी आठवडा साजरा करायचे. तो खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ होता, अशी भावना सुप्रिया यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”

१९८२ पासून मी आणि अशोक एकत्र

या चित्रपटाच्या निमित्ताने अशोक सराफ, सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या आपल्या आवडत्या कलाकारांना पुन्हा एकदा एकत्र काम करताना पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळाली आहे. त्यानिमित्ताने, आजवरच्या प्रवासाबद्दल बोलताना आपल्यापेक्षा सचिन आणि अशोक सराफ यांचा एकत्रित प्रवास खूप मोठा आहे, असं सुप्रिया यांनी सांगितलं. तर पडद्यावर आणि पडद्याबाहेर या दोघांची साथ कशी मिळाली त्याची आठवण सचिन यांनी सांगितली. ‘मायबाप’ हा मी आणि अशोक सराफ यांनी एकत्र काम केलेला पहिला चित्रपट होता. १९८२ पासून आम्ही एकत्र काम करत आहोत. १९८४ नंतर सुप्रियानेही आमच्याबरोबर काम सुरू केलं. माझ्या कलाकारकीर्दीत गणरायाने खूप मोठा आशीर्वाद मला या दोघांच्या रूपाने दिला. माझा उजवा हात म्हणजे अशोक सराफ. उजव्या हाताशिवाय आपण काहीच करू शकत नाही आणि सुप्रिया ही वामांगी रखुमाई. मला नवी काही कल्पना सुचली तर त्याविषयी चर्चा करायला, माझ्या हातून काही चुकलं असेल तर ते दाखवायला हे दोघं कायम होते. या दोघांची साथ मिळाली म्हणून मी परिपूर्णतेच्या जवळ जाऊ शकलो असं मला वाटतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.