सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉल हिने गुडन्यूज दिली आहे. अमाला लवकरच आई होणार आहे. तिने ५ नोव्हेंबर २०२३ रोजी केरळमधील कोची येथे तिचा बॉयफ्रेंड जगत देसाई याच्याशी लग्न केलं होतं. अमालाचं हे दुसरं लग्न होतं. लग्नानंतर दोन महिन्यांनी अमालाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आनंदाची बातमी दिली आहे.
अमालाने बीचवरील फोटोशूटचे तीन फोटो शेअर केले आहेत. थोड्या हटके फोटोंमधून तिने चाहत्यांबरोबर गुडन्यूज शेअर केली आहे. ‘आता मला माहित आहे की १+१ हे तुझ्याबरोबर ३ आहेत!’ असं कॅप्शन अमालाने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये दिलं आहे.
अमालाने ही आनंदाची बातमी शेअर केल्यावर तिच्या पोस्टवर कमेंट करून चाहते व सेलिब्रिटी तिला शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री काजल अग्रवालनेही अमला व जगतचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, लग्नाच्या काही दिवसांपूर्वी जगत देसाईने अमाला हिला गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये प्रपोज केलं होतं. जगत गोव्याचा असून तो तिथल्या एका प्रसिद्ध लक्झरी व्हिलामध्ये मॅनेजर म्हणून काम करतो.
अमालाबद्दल बोलायचं झाल्यास तिचे पहिले लग्न तमिळ दिग्दर्शक एएल विजयशी झाले होते, पण तीन वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेतला होता. २०१४ मध्ये या जोडप्याने लग्न केलं आणि २०१७ मध्ये ते विभक्त झाले होते. त्यानंतर तिने जगतशी दुसरं लग्न केलं आणि लवकरच ते पालक होणार आहेत.